नागपूर : उन्हाळ्यात माणसांची काहिली होते, तशीच वन्यजीवांचीही होते. यावर्षी तर ती अधिकच होईल असे संकेत वाढत्या तापमानाने दिले आहेत. मात्र, अवकाळी पाऊस पुन्हा डोकावला. त्यामुळे वातावरण पूर्णपणे पावसाळी झाले. मग काय.. उन्हाळ्यात अंगाची काहिली शांत करण्यासाठी तासनतास पाणवठ्यात डुंबून राहणाऱ्या वन्यप्राण्यांनी पावसाचाही तेवढाच आनंद घेतला. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी हे प्रसंग तसे नित्याचेच. तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर गेला असताना अचानक पावसाचे ढग दाटले.
वादळीवाऱ्यासह गडगडाटी पावसाने ठाण मांडले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अस्वलांनी या पावसाळी वातावरणाचा चांगलाच आनंद लुटला. अस्वलाने तर चक्क त्याच्या पिलाला पाठीवर घेत जंगलात फिरवले. अचानक आलेल्या पावसामुळे ताडोबाच्या वन्यजीवांना सुखद अनुभव मिळाला. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला-रामदेगी बफरक्षेत्रात गुरुवारी सकाळी सफारीदरम्यान पर्यटकांना हे दृश्य दिसले. मादी अस्वलाने तिच्या पिल्लाला पाठीवर घेतले आणि अख्खे जंगल पालथे घातले. एरवी वाघांसाठी व्याकूळ होणाऱ्या पर्यटकांना मादी अस्वल आणि तिच्या पिल्लाने चांगलाच आनंद दिला.
‘डेक्कन ड्रिफ्टस’चे प्रमुख व वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे आणि कांचन पेटकर यांनी ही दृश्ये कॅमेऱ्यात टिपली. निमढेला सफारी प्रवेशद्वारातून आत जाताच मादी अस्वल आणि तिच्या पाठीवर असलेले पिल्लू त्यांना पर्यटन मार्गावर दिसून आले. यावेळी पर्यटकांनी मोगली या मालिकेतील आठवणींना उजाळा दिला. वाघ दिसला नसला तरी या दृश्यांनी पर्यटक चांगलेच आनंदित झाले. मादी अस्वल तिच्या पिल्लांना पाठीवर घेऊन फिरते, पण हे दृश्य नेहमी पाहायला मिळत नाही. ताडोबातील पावसाळी वातावरणाने मात्र पर्यटकांना ही पर्वणी घडवली.