अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी वाहन चालवण्याचा आनंद घेतला. वाशीम ते अकोला दरम्यान त्यांनी स्वत: ‘ड्रायव्हिंग’ केले. वाशिम येथे रविवारी त्यांनी पक्षाची आढावा बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना गट-तट सोडून कामाला लागण्याचे आदेश दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन ते चाचपणी करीत आहे. शनिवारी रात्री वाशिम येथे त्यांचा मुक्काम होता. वाशिम शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचा आढावा घेतला. यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे उपस्थित होते. पदाधिकार्यांना पक्ष बांधणी करून गट-तट न करता एक दिलाने काम करण्याच्या सूचना दिल्या. लवकरच पक्षात फेरबदल होईल. दोन जिल्हाध्यक्ष न राहता एक जिल्हाध्यक्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षातील गटबाजी सोडून एक दिलाने काम करण्याची गरज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षासाठी पोषक वातावरण आहे. राज्यातील २०० ते २२५ मतदारसंघात मनसेचे उमेदवार असतील. त्यासाठी तयारी करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पक्ष मजबूत करण्यावर पदाधिकार्यांनी भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. जवळपास अर्धा तास राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. या आढावा बैठकीनंतर ते स्वतः चारचाकी वाहन चालवत पातूरमार्गे अकोला शहरात दाखल झाले.
हेही वाचा…राज्यात तोतया सायबर पोलिसांचा सुळसुळाट, तब्बल २० कोटी…
अकोल्यात जोरदार स्वागत
वाशिम येथून अकोला शहरात दाखल होताच राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मनसेचे पदाधिकारी व मनसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. क्रेनद्वारे एका भव्य पुष्पहाराद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी व मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा…नागपूर : गांजा-ड्रग्जच्या नशेत तरुण-तरुणी धुंद! ‘त्या’ पबला राजकीय वरदहस्त
अन् त्याच कक्षात पोहोचले राज ठाकरे
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यात काही दिवसांपूर्वीच वाद पेटला होता. मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या वाहनांची तोडफोड करून विश्रामगृहात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आज राज ठाकरे अकोला दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहातील त्याच कक्षात ते काही काळासाठी गेले होते.