महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते अनेक गाठीभेटी घेणार असुन, उद्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करणा आहेत. आज राज ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, नितीन गडकरींच्या आग्रहास्तव राज ठाकरे यांनी नागपुरमधील फुटाळा तलाव आणि संगीत कारंजांचा ‘लेझर शो’ पाहिला. या कार्यक्रमानंतर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची जाहीरपणे स्तुती देखील केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
यावेळी नितीन गडकरी यांनी म्हणाले की “कुंचल्यापासून ते साहित्यापर्यंत, कार्टुनपासून ते संगीतापर्यंत सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असे ते(राज ठाकरे) कलाकार आहेत. विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे, की ज्यांच्या नावाने आपण या कारंजांचे नाव स्वर्गीय लता मंगेशकर असं करणार आहोत. त्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध होते. त्यांचं राज ठाकरेंवर पुत्रवत प्रेम होतं. म्हणून आज जेव्हा ते नागपुरात आले तेव्हा त्यांना मी आमंत्रित केलं आणि मला खूप आनंद आहे की ते इथे आले. राज ठाकरे हे कलाकर आहेत, ते इथे आले आणि त्यांनी हे बघितलं. कलेच्या क्षेत्रातील त्यांचं स्थान मोठं आहे.”
“नितीन गडकरी जे काही करतात ते ‘वरून’च करतात, आमचं जुळतं कारण…”; राज ठाकरेंचं नागपुरात विधान!
तर संगीत कारंजाच्या लेझर शो बद्दल राज ठाकरेंना अधिक माहिती देताना गडकरींनी सांगितले की “आज आपण जो हा कारंजा बघितला त्याच्या बाजूला एका दहा हजार स्क्वेअर फुटांचा फ्लोटींग प्लॅटफॉर्म होणार आहे आणि त्याच्या बाजूला एक झाड राहणार आहे. ते खूप मोठ्या आकारत आहे. अनेक छोट्यामोठ्या गोष्टी असतील. इथे संगितापासून ते अन्य कुठलेही कार्यक्रम झाले तर त्याचा लोकांना आनंद घेता येईल. या ठिकाणच्या गॅलरीत साधारण तीन हजार लोक खुर्च्यांवर बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तलावाच्या मध्यभागी ८० हजार स्क्वेअर फुटाचं रुफटॉप सोलर असं एक मोठं रेस्टाँरंट होणार आहे. तिथे बोटीमधून जाता येणार आहे. याच्या मागे एक इमारत उभा राहत आहे, चार मजले तयार झाले आहेत ती एकूण ११ मजली आहे. त्यामध्ये ११०० गाड्यांचं वाहनतळ आहे आणि तिसऱ्या मजल्यापासून ३०-३० हजार स्क्वेअर फूट असे फूड मॉल्स जिथे गरीब माणसांना स्वस्तात पावभाजी आणि भेळपुरी खाता येणार आहे. दहाव्या मजल्यावर चार मल्टिप्लेक्स आहेत आणि अकराव्या मजल्यावर रिव्हॉलव्हिंग रेस्टॉरंट आहे. त्याचबरोबर जो तेलंगडी तलाव आहे, त्याच्यासमोर ७०० गाड्याचं वाहनतळ आणि तिथून थेट संगीत कारंजाच्या ठिकाणी येण्याची सोय असणार आहे. त्या तलावाला आम्ही लोटस गार्डन बनवणार आहोत. सध्या साडेनऊशे कमळाच्या जाती एकत्रित केलेल्या आहेत. याच्या बरोबर विरुद्ध दिशेला एक बॉटनिकल गार्डन आहे. तिथे जगातलं जसं बूचार्ट गार्डन तुम्ही कॅनडात व्हॅकुव्हरला बघितलं असेल, तिथून प्रेरणा घेऊन तिथे आम्ही आता साडेपाच हजार गुलाबांच्या जाती एकत्रित केलेल्या आहेत. अतिशय मोठा असा परिसर असून त्या ठिकाणी एक मोठं फुलांचं उद्यान होणार आहे.”
याचबरोबर “हा जो कारंजा आहे तो फ्लोटिंगवर ६० मीटर उंच जाणारा जगातील पहिला कारंजा आहे. याचे आर्टिकेक्ट फ्रान्सचे आहेत. याचे पंम्प टर्कीमधील आहेत. यासाठी संगीत ए आर रहमान यांनी दिलेलं आहे. यांचं इंग्रजीमधील समालोचन हे अमिताभ बच्चन यांचं होतं. हिंदीमध्ये गुलजार यांची आणि मराठीत नाना पाटेकरांची आहे. यामध्ये संगीत क्षेत्रातील पाच ऑस्कर पुरस्कार विजेत्यांनी देखील योगदान दिलेलं आहे. रेवती नावाची तामिळ आणि तेलगु अभिनेत्री आहे तिने देखील काम केलेलं आहे.” अशी देखील माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.