Raj Thackeray : गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं आहे. माझ्या हातात एकदा सत्ता द्या, आरोपींना कायद्याचा धाक काय असतो, हे दाखवून देतो, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. ते यवतमाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
कदाचित दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणूक होतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने मी राज्याचा दौरा आखला आहे. मराठवाड्याचा दौरा झाला, आता विदर्भाचा दौरा सुरू आहे. यंदा आपण २०० ते २१५ जागा लढणार आहोत. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झालं आहे. जनता उन्हात उभं राहून मतदान करते आणि मग आमदार विकले जातात. याचा जनतेला राग आला पाहिजे. विधानसभा निवडणूक ही राग व्यक्त करण्याची संधी आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
बदलापूरमधील घटना मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे पुढे आली. तोपर्यंत ही घटना दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर राज्यातील अशाच इतर घटनाही बाहेर येऊ लागल्या आहेत. आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते. ते असते, तर असे गुन्हे करण्याची कुणाची हिंमत झाली नसती. खरं तर महाराजांनी रांझाच्या पाटलाचे हातपाय कापून जसा चौरंगा केला होता, तीच शिक्षा बलात्कार करण्यांना दिली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घटत आहेत, कारण आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही. एकदा माझ्या हातात राज्याची सत्ता दिली, तर कायद्याचा धाक काय असतो, हे आरोपींना दाखवून देईन, असेही ते म्हणाले.
माझा महाराष्ट्र पोलिसांवर मुंबई पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. यांच्या हातात जर सगळं काही दिलं तर ते महाराष्ट्र कोरा करकरीत करू शकतात. मुळात कोण, कुठे, काय करतोय, कोणाचं कसं चाललंय, या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहिती असतात. परंतु, सरकार त्यांना पाठिंबा देत नाही. तरीदेखील त्यांनी कारवाई केलीच तर सरकारही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करतं आणि हेच आजवर होत आलं आहे. मात्र पोलिसांना पाठिंबा मिळाला तर कोणाचीही आपल्या आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही.
पुढे बोलताना त्यांनी वणी मतदारसंघासाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणाही केली. वणी विधानसभा मतदारसंघातून मी राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहावं आणि त्यांना विधानसभेत पाठवावं. असं राज ठाकरे म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.