नागपूर: डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी हे प्राध्यापक भरतीवरून चांगलेच चर्चेत आले आहे. प्राध्यापक भरतीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. मात्र, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी हे आरोप फेटाळले आहेत. सर्व सदस्यांच्या पत्रानुसार मुलाखतीसाठी सचिव म्हणून मी बसावे, अशी विनंती असतानाही संपूर्ण मुलाखती अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत झाल्या. प्राचार्य स्वत: उपस्थित होत्या. या मुलाखतीमध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नव्हता, असा दावा डॉ. राजेंद्र गवई यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> चंद्रावर उतरलेले ‘प्रज्ञान’ व ‘विक्रम’ पुढील चौदा दिवस काय कामगिरी करणार ? जाणून घ्या…

दीक्षाभूमी ही सर्व समाजाची असल्याने नोकरीसाठी समाजातील शेकडो लोकांकडून विनंती पत्र येतात. त्याला आम्ही मान देतो. मात्र, प्राध्यापक भरतीमध्ये कुठलाही हस्तपेक्ष नसताना दीक्षाभूमीला बदनाम करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत असून समाज त्यांना माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. पदभरतीवरून असे आरोत होतात याची जाणिव असल्याने २३ मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्राध्यापक भरती सरळ शासनाच्या स्तरावर करावी, अशी विनंतीही केल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले. मागील काही दिवसांआधी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी प्रकृतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजेंद्र गवई यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयांमध्ये २७ सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू झाली. या भरतीमध्ये काही सदस्यांनी निवडक उमेदवारांच्या निवडीसाठी दबाव आणत भ्रष्टाचार केल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा >>> नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणात मध्यप्रदेशातील आमदार संजय शर्मा यांची चौकशी

यासंदर्भात सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी सर्व आरोप फेटाळत सांगितले की, प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू होत असतानाच यावरून वाद होण्याची शक्यता दिसत होती. त्यामुळे सुरुवातीलाच ही भरती सरकारला करू द्यावी अशी विनंतीही आपण केली होती. त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा मुद्दाच उरत नाही. याशिवाय उमेदवारांच्या मुलाखती घेताना नऊ सदस्यांनी राजेंद्र गवई यांनी मुलाखतींसाठी बसावे असे पत्र दिले होते. मात्र, त्यानंतरही अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे त्याला आम्ही विरोध केला नाही. सर्व मुलाखती अध्यक्षांच्या देखरेखीत झाल्या. संपूर्ण पदभरतीची यादीही अध्यक्षांनीच अंतिम केली. ती विद्यापीठाकडे सुपूर्दही करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत सचिव किंवा सदस्य कुठेही नसताना नाहक आरोप करून समाजाच्या प्रतिष्ठीत संस्थेला बदनाम करण्याचा प्रकार सुरू असल्याचे डॉ. गवई म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajendra gavai denied corruption allegations on dr babasaheb ambedkar smarak samiti dag 87 zws
Show comments