भंडारा : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियम व आदेशाचे राजपत्र २९ जून २०१७ रोजी प्रकाशित करण्यात आले. त्यातील क्रमांक तीनमध्ये शिक्षणाधिकारी पदावरील नियुक्ती कशी केली जावी याबाबत स्पष्ट निर्देश आहेत, असे असताना वर्ग दोनचे अधीक्षक असलेले रवींद्र सलामे यांना शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार कसा देण्यात आला? असा प्रश्न भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे यांनी उपस्थित केला आहे. अशाप्रकारे शिक्षण अधीक्षकांना कार्यभार देण्याची ही पहिलीच वेळ असून ही नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप बालपांडे यांनी केला आहे.

तीन वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांची पदोन्नती होऊन ते मुंबई येथील प्रकल्प उपसंचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद येथे रुजू झाले.त्यानंतर रिक्त झालेल्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावर भंडारा जिल्हा परिषद येथील वर्ग २ चे अधीक्षक रवींद्र सलामे कार्यभार देण्यात आला. अधीक्षक हे पद शालेय प्रशासन व्यतिरिक्त कामकाजाचे पद असल्यामुळे नियमानुसार वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देता येत नाही. तथापि, कार्यभार देताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उप शिक्षणाधिकारी यांना आधी प्राधान्य द्यायला हवे होते. मात्र नियमाला डावलून सलामे यांना पदभार देण्यात आला असा आरोप भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे यांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला. मागील काही दिवसांपासून ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.

शिक्षण विभागाचे प्रमुख पद म्हणजे शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सामान्यतः राज्य शासनाच्या वर्ग एकचे अधिकारी असतात. वर्ग दोनचे अधिकारी उप शिक्षणाधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या नियम व आदेश २९ जून २०१७ रोजी राजपत्र प्रकाशित केले. त्यातील क्रमांक तीन मध्ये वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला शिक्षणाधिकारी पदाचे कार्यभार देता येऊ शकत नाही असे स्पष्ट निर्देश आहेत.

वर्ग दोनचे अधिकारी असलेले रवींद्र सलामे यांनी शिक्षणाधिकारी पदभार घेण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मुळात अनेक ठिकाणी गट शिक्षणाधिकारी पद रिक्त असताना सलामे यांची तेथे नियुक्ती न करता नियमांची पायमल्ली करून त्यांना शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला यातच सगळे काही दडलेले आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी पदावरून सलामे यांना कमी करून नियमानुसार संबंधित अधिका-यांना कार्यभार देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे यांनी केली.