अमरावती : राजकुमार पटेल यांनी १० ऑक्‍टोबरला धारणी येथील जिल्‍हा परिषद शाळेच्‍या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले होते. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते मेळघाट मतदारसंघातील ७०७ कोटी रुपयांच्‍या निधीतील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार असल्‍याचे राजकुमार पटेल यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, ज्‍येष्‍ठ उद्योगपती रतन टाटा यांच्‍या निधनामुळे त्‍यांच्‍या सन्‍मानार्थ एक दिवसाचा दुखवटा पाळण्‍यात येणार असल्‍याने आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्‍यात आले आणि राजकुमार पटेल यांना शिवसेना प्रवेशही लांबला. मेळघाट विधानसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्‍ती पक्षाच्‍या उमेदवारीवर गेल्‍या निवडणुकीत निवडून आलेले राजकुमार पटेल यांनी बच्‍चू कडू यांचे नेतृत्‍व झुगारून शिवसेना शिंदे गटासोबत जाण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर तत्‍काळ त्‍याचे पडसाद उमटले.

हे ही वाचा…चक्क पोलीस ठाण्यावरच काढला विनापरवानगी मोर्चा, पुढे घडलं काय?

शिंदे गटाने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली, तर त्‍यांच्‍या विरोधात युवा स्‍वाभिमान पक्षाचा उमेदवार उभा करू आणि त्‍याला निवडून आणू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. दुसरीकडे, त्‍यांच्‍या पत्‍नी नवनीत राणा यांनी दर्यापूर आणि मेळघाट मतदारसंघात कमळ चिन्‍ह राहील, अशी घोषणा केली.

बच्‍चू कडू यांनी महायुतीच्‍या धर्माचे पालन केले नाही, अशी टीका रवी राणा यांनी केली. बच्‍चू कडू यांच्‍या संमतीनेच राजकुमार पटेल हे शिंदे गटात गेले, असा दावा देखील त्‍यांनी केला. मेळघाटमध्ये एकतर कमळ पाहीजे, नाहीतर युवा स्वाभिमान पक्ष पाहिजे.

दर्यापूर मतदारसंघ कोणत्‍या पक्षाला मिळेल, हे निश्चित झालेले नाही. जेव्हा होईल, तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. युवा स्वाभिमान पक्षाने मेळघाट आणि दर्यापूरची जागा मागितली आहे, असे रवी राणा यांचे म्‍हणणे आहे.

गेल्‍या निवडणुकीत जिल्‍ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला होता. भाजपला जिल्‍ह्यात आपले स्‍थान भक्‍कम करण्‍याची इच्‍छा आहे, पण महायुतीत जागा वाटपाच्‍या चर्चेत पेच निर्माण झाला आहे. राजकुमार पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर ती जागा भाजपला त्‍यांच्‍यासाठी सोडावी लागेल.

हे ही वाचा…बुलढाणा: बुधवार ठरला घातवार, विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू

दर्यापूर मतदारसंघावर आधीच शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी दावा केला आहे. ही शिवसेनेची परंपरागत जागा आहे, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. मात्र, राणा दाम्‍पत्‍याने अडसूळ यांच्‍या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. त्‍यातच आता मेळघाटवरूनही राणा दाम्‍पत्‍य आणि राजकुमार पटेल आमने-सामने आले आहेत. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश गुरूवारी टळला, पण त्‍यांच्‍यासमोरील अडचणी कायम आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkumar patel shiv sena entry delayed due to ratan tatas death mma 73 sud 02