लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

शहरात उष्माघाताचा प्रभाव कमी करण्यासाठी उष्माघात कृती आराखड्यात उष्णता, पाणी, नैसर्गिक संसाधनांनुसार व्यवस्थापन आवश्यक आहे, असे मत विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीएनआयटी) वस्तूकला आणि नियोजन विभागाच्या प्रा. राजश्री कोठारकर यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. प्रा. राजश्री कोठारकर म्हणाल्या, शहरातील संरचना बघितल्यास येथे मध्य नागपूरसह इतरही काही भागात खूपच दाटीवाटीने घरे, दुकाने आहेत. सीमा भागात लांब-लांब अंतरावर घरे आहेत. घराच्या शेजारी वृक्षही कमी होत आहे. सिमेंट रस्त्यांमध्ये सतत वाढ होत असून तापमानही वाढत आहे. या वाढीव तापमानाकडे लक्ष द्यायला हवे. उष्माघाताची झळ कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. त्यादृष्टीने नागपूर महापालिका उष्माघात कृती आराखड्यावर काम करत आहे. शहरात उन्हाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रथम रस्त्यांच्या कडेला व मैदानाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आवश्यक आहे. हे वृक्ष स्थानिक असावे. जेणेकरून ते येथील वातावरणाशी एकरूप होतील. वृक्षामध्ये उष्णता कमी करण्याची क्षमता असल्याने तापमान कमी होते. कमी उंचीच्या घर-इमारतींच्या छतांना पांढरा रंग दिल्यास उन्हाची तीव्रता कमी होते. गगनचुंबी इमारतीमध्ये छताच्या तुलनेत इमारतीच्या भिंतीवर ऊन जास्त पडते. त्यामुळे छताहून भिंती जास्त उष्णता शोषतात. भिंतीला फिक्कट रंग लावल्यास व हवा खेळती राहिल्यास उन्हाची झळ कमी होते. झोपडपट्टीत दाटीवाटीने घरे असल्याने येथे छतावर उष्णता कमी करणारे आवरण लावणे फायद्याचे आहे. उष्माघात कृती आराखड्यात या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे, असेही प्रा. कोठारकर म्हणाल्या.

हेही वाचा >>>गोंदिया : दोन चालकांच्या भांडणात ट्रेलर सुटला अन् थेट खासदाराच्या वाहनाला धडकला; पुढे काय झाले वाचा..

रेन वॉटर हार्वेस्टिंग महत्त्वाचे

तापमान कमी करण्याकरिता पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरवण्यासाठी घर, इमारत, रस्ते या सगळ्याच ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय हवी. त्यासाठी सिमेंट रस्त्याशेजारी, इमारतीला लागून स्थानिक प्रशासनाने सुविधेसाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही कोठारकर यांनी सांगितले.

सिग्नल व्यवस्थापनाकडे लक्ष हवे

नागपुरातील तापमान जास्त राहत असल्याने दुपारी रस्त्यांवरील वर्दळ कमी होते. त्यामुळे खूपच कमी वर्दळ असलेल्या चौकांचा यंत्रणांनी अभ्यास करून गरज नसलेल्या ठिकाणचे सिग्नल दुपारी बंद ठेवायला हवेत. त्यामुळे चौकात नागरिकांना थांबावे लागणार नाही. परिणामी, उन्हाचा त्रास कमी होईल, याकडे प्रा. कोठारकर यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा >>>दक्षिण नागपुरात वीज संकट, कधीही पुरवठा खंडित होण्याचा धोका, काय आहे कारण?

पदपथाच्या रचनेबाबतही मंथन आवश्यक

शहरातील सगळ्याच महत्त्वाच्या रस्त्यांवर पदपथ आहेत. या पदपथाच्या रचनेकडे लक्ष देत कमी उष्णता शोषेल अशा पद्धतीने ते तयार करण्याची गरज आहे. त्यातूनही तापमानाची तीव्रता कमी होऊ शकते.

जनजागृती, अद्ययावत उपचाराची सोय हवी

उष्माघाताचा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचून विशेष जनजागृती करावी. सोबत नागरिकांना उष्माघात झाल्यास तातडीने योग्य उपचारासाठी रुग्णालयात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही कोठारकर म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajshree kotharkar opinion that heat water and resources should be considered in the heat stroke action plan mnb 82 amy