लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाले. गतवेळी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ह्या येथून निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांची उमेदवारी कापून शिंदे सेनेने त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील महाले यांना रिंगणात उतरविले तर शिवसेना उबाठा गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख होते. येथून १७ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख अशीच होती. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला असला तरी कोण जिंकणार याचा फैसला उद्या ४ जून रोजी होणार आहे.

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ हा पारंपरिक शिवसेनेचा गड राहिला आहे. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यावेळची निवडणूक लक्षवेधी ठरली. मागील पाच टर्म पासून खासदार भावना गवळी येथून निवडून येत आहेत. मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाने ऐनवेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर शिवसेनेने येथून पुन्हा भगवा फडकविण्यासाठी आधीपासून च माजी मंत्री संजय देशमुख यांना मैदानात उतरविले. येथून १७ उमेदवार लढत देत असले तरी खरी लढत ही शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील महाले विरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे संजय देशमुख यांच्यात झाली.

आणखी वाचा- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संतापून म्हणाले, “मोक्का लावा पण यांना सोडू नका…”

लोकसभेच्या दुसऱ्या टप्यात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदान वाढले. यंदा सरासरी ६२.८७ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का १.७८ टक्क्यांनी वाढला. शहरी भागात मतांची टक्केवारी कमी असली तरी ग्रामीण भागात मात्र मतदारांनी भरभरुन मतदान केले. १९ लाख ४० हजार ९१६ मतदारांपैकी १२ लाख २० हजार १८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६१.३१ टक्के इतकी होती. हा वाढलेला मतदानाचा टक्का कुणाला विजय मिळवून देते. याची प्रतीक्षा उद्या संपणार आहे.

दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. मतमोजणी उद्या ४ जून रोजी होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे. ८४ टेबल वर सकाळी ८ वाजता पासून मतमोजणी सुरु होईल. यासाठी ८०० कर्मचारी व चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणी कितीही विजयाचे दावे केले असले तरी यवतमाळ वाशीम चा खासदार कोण हे उद्या च स्पष्ट होईल. मात्र तत्पूर्वी सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.

आणखी वाचा-वाशीम : ‘समृद्धी’वर पुन्हा भीषण अपघात; तीन जण ठार

वाशीम, कारंजातून कोण घेणार लीड !

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. यापैकी वाशीम जिल्ह्यातील कारंजा मानोरा व वाशीम मंगरुळपीर हे दोन विधानसभा मतदार संघ येतात. या दोन्ही विधानसभा मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांना लीड मिळणार की महाविकास आघाडीचे संजय देशमुख अधिक मताधिक्य घेतात. हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajshree patil mahale or sanjay deshmukh who is mp from yavatmal washim loksabha pbk 85 mrj
Show comments