नागपूर : जर्मन चॅन्सेलर फेलोशिप ही जर्मन सरकारच्या संशोधन क्षेत्रातील जगमान्यता प्राप्त आलेक्सांडर फाऊंडेशनद्वारे दिली जाते. १९५३ पासून कार्यरत असलेल्या या फाऊंडेशनने विदर्भातील भटक्या समाजातील शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे यांची या प्रतिष्ठित फेलोशीपसाठीची निवड केली.
केंद्रे हे जर्मन चॅन्सलर फेलोशिपच्या माध्यमातून जर्मनी व भारतातील उच्च शिक्षणाचा तुलनात्मक अभ्यास करणार आहे, उच्च शिक्षणातील असमानता व त्यावरचे धोरणात्मक बदल या विषयात त्यांचे संशोधन आणि कार्य असणार आहे.
या माध्यमातून ते जर्मनीसोबतच युरोपातील विद्यापीठे प्रत्यक्षपणे समजून घेणार आहेत, तेथील धोरणे, संशोधन क्षेत्र, व वंचित समुदायाचा मुख्य प्रवाहात समावेश, हा अभ्यास भविष्यकाळात भारतातील शिक्षण क्षेत्रात व वंचित समुदायांसाठी महत्वाचा ठरणारा असेल. फेलोशीपच्या माध्यमातून ते दिड वर्ष जर्मनीमध्ये बोन, बर्लिन शहरात व युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगन विद्यापीठात मॉडर्न इंडिया सेंटरसोबत काम करणार आहेत.
हेही वाचा – विमलाश्रमच्या रामभाऊ इंगोले यांना आर्थिक मदतीची गरज, दानशूर व्यक्तींना आवाहन
हेही वाचा – प्रचाराच्या रणधुमाळीत व्यक्तिगत टीका, टिप्पणीपासून ‘हा’ नेता अलिप्त
राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोट्याश्या खेड्यातील भटक्या समाजातून येतात. केंद्रे यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. २०११ मध्ये बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात गेले पण सामाजिक व आर्थिक अडचणीमुळे अवघ्या सहा महिन्यांत त्यांना पुणे सोडावे लागले. त्यनंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले. मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजू केंद्रे यांना दोन वर्षे सातपुडा भागातील मेळघाट आदिवासी भागात काम करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून सामाजिक कार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आजही उच्च शिक्षणापासून लाखो विद्यार्थी वंचित आहेत म्हणून हाच प्रश्न घेऊन त्यानी पुढे एकलव्य इंडिया फाऊंडेशनची स्थापना केली, त्यामाध्यमातून भारतभरातील विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे.