नागपूर : रॉयल सोसायटी आर्ट्स (आरएसए) ही लंडन स्थित ब्रिटिश बहू-विषय संस्था आहे. १७५४ पासून कार्यरत असलेला या जगप्रसिद्ध संस्थेत बेंजामिन फ्रँकलिन, कार्ल मार्क्‍स, अ‍ॅडम स्मिथ, विल्यम होगार्थ, नेल्सन मंडेला आणि चार्ल्स डिकन हे ‘फेलो’ राहिले आहेत. आता या यादीमध्ये शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे यांचे नाव जोडले जाणार आहे. त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स येथे फेलो म्हणून निवड झाली आहे. राजू केंद्रे हे विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे हा छोटय़ा खेडय़ातील भटक्या समाजातून येतात. त्यांच्या आई-वडिलांचे प्राथमिक शिक्षणही झाले नाही. राजू केंद्रे हे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच उच्च शिक्षण घेणारे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेले. मात्र, त्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेता आले नाही. परिस्थितीअभावी शेवटी त्यांनी मुक्त विद्यापीठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांना मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. यावेळी आदिवासींचे प्रश्न व अडचणी पाहून केंद्रे अस्वस्थ झाले. पुढे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून एकलव्य फाउंडेशनची स्थापना केली. २९ वर्षीय केंद्रे सध्या एकलव्य संस्थेच्या माध्यमातून पूर्णवेळ ग्रामीण वंचित समुदयासाठी कार्यरत आहेत. त्यांची याआधी एसओएएस यूनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित चेविनग शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती. मागच्या वर्षी प्रतिष्ठित अशा ‘फोर्ब्स’ मासिकाने सुद्धा त्यांचा ३० प्रतिष्ठित युवकांच्या यादीत समावेश केला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju kendre was elected to the royal society of arts london ysh
Show comments