नागपूर : विधानसभा निवडणुकीत उमरेड मतदार संघातून माघार घेतल्यानंतर माजी आमदार राजू पारवे यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुरुवातील काँग्रेसमध्ये, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेत आणि आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजू पारवे मुळचे कॉंग्रेसचे. या पक्षाकडून ते २०१९ मध्ये उमरेडचे आमदार म्हणून निवडून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीज्ञकाँग्रेसचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षाकडून ते रामटेक लोकसभा निवडणूक लढले.

हेही वाचा…धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…

त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर सेनेकडून उमरेड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने त्यांनी पक्षाकडे अर्ज केला होता. मात्र या मतदार संघातून भाजपने माजी आमदार सुधीर पारवे यांची शेवटच्या क्षणी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राजू पारवे यांनी सुधीर पारवे यांचा पाठिंबा जाहीर करुन निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे त्यांची अवस्था तेलही गेले अन् तुपही अशी झाली होती. पुढे ते काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी प्रचार मिरवणुकीच्या निमित्ताने नागपूरला आले होते. प्रचार मिरवणूक संपल्यानंतर मुंबईला निघत असताना राजू पारवे धरमपेठेतील फडणवीस यांच्या निवास्थानी १० ते १२ समर्थकांसह पोहचले. फडणवीस यांना मुंबईला जायचे असल्यामुळे त्यांनी पारवे यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घालत पक्षात प्रवेश करुन घेतला आणि त्यांचे स्वागत केले. भाजपच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांना या पक्ष प्रवेशाची माहिती नसल्यामुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला.

हेही वाचा…आघाडीस धक्का! ‘ आप ‘चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमरेड राखीव मतदारसंघातून राजू पारवे कॉंग्रेसचे उमेदवार होते व त्यांनी भाजपचे सुधीर पारवे यांना पराभूत करून ही जागा दहा वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते रामटेक लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून लढणार अशी चर्चा होती. तशी तयारीही राजू पारवे यांनी सुरू केली होती. पण ऐनवेळी ही जागा भाजपऐवजी शिंदे गटाला गेली. त्यामुळे राजू पारवे यांनी काँग्रेसचा त्याग करून शिंदे सेनेत प्रवेश केला पण त्यात ते पराभूत झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमरेडची जागा शिंदे गटासाठी सोडली जाईल व तेथून पुन्हा त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. महायुतीत या जागेवरचा उमेदवारही शेवटच्या दिवसापर्यंत जाहीर केला नव्हता. अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी भाजपने या जागेवर सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. त्यामुळे पारवे यांच्या हाती काहीच लागले नाही. सुधीर पारवे यांच्या प्रचाराला ते कामाला लागले होते मात्र शिंदेच्या शिवसेनेत असताना मंगळवारी अचानक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजप वर्तुळात राजू पारवे यांच्या प्रवेशाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju parve resigned from umred constituency and joined bharatiya janata party vmb 67 sud 02