वर्धा : लहान गावात फारसे पोषक वातावरण नसल्याने अंगी गुणवत्ता असूनही व्यक्तिमत्वास बहर येत नसल्याचे व गुणवंतांना संधी मिळत नसल्याचे सार्वत्रिक चित्र असल्याचे म्हटल्या जाते. पण गावातच राहून उंच भरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे एक उदाहरण पुढे आले आहे. कारंजा घाडगे या गाववजा खेड्यातून आलेल्या रक्षा विनोद खेनवार हिने व्हॉलीबॉल खेळत नैपून्य प्राप्त केले. ती आता या खेळात भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. १ ते ८ जुलै दरम्यान चीनमध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी रक्षा रवाना झाली आहे. भारतातील १२ मुलीचा चमू ( ६ खेळणारे व ६ राखीव ) या वीस वर्षाखालील वयोगटात खेळणार.

रक्षा हिने पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण कारंजा येथील मॉडेल हायस्कूल मध्ये पूर्ण केले. गावात व्हॉलीबॉल प्रेमिची संख्या अधिक असल्याने रक्षाचा कल पण याच खेळाकडे वाढला. २०१७ – १८ मध्ये याच शाळेत विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावात निवास भोजन व्यवस्था नसल्याने या स्पर्धेचे आयोजन गावकऱ्यांनीच केले. अनेक मोठ्या घरी खेळाडू व पंच मंडळींची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा…पश्चिम विदर्भात पाणीबाणी, पावसाळ्यातही टँकरच्या संख्‍येत वाढ; १०५ गावांना टँकरने पाणीपुरवठा

निवृत्त मुख्याध्यापक विलास वानखेडे सांगतात ही स्पर्धा गावात अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. आम्ही या कार्यात गावातील मुलांचेच सहकार्य घेतले होते. रक्षा पण त्यात होती. मॉडेल स्पोर्ट असोसिएशन स्थापन करण्यात आली. तिथे रक्षा शिकली. पुढे हॉलिबॉलचे चांगले प्रशिक्षण कुठे मिळणार, याचा शोध घेतल्यावर रक्षाच्या कुटुंबाने तिला नगर जिल्ह्यात अकरावी बारावी करण्यास पाठविण्यात आले. या ठिकाणी खेळ प्रशिक्षण देण्याची उत्तम सोय असल्याचे तिचे प्रशिक्षक दिलीप जसूदकर हे सांगतात.

हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना अर्थसंकल्प समजत नाही, त्यामुळे…”, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका; म्हणाले…

येथून प्राविण्य मिळाले आणि रक्षाची निवड १७ वर्षाखालील राष्ट्रीय संघात झाली. मग तिने मागे वळून पाहलेच नाही. व्हॉलीबॉल चे चांगले प्रशिक्षण जिथे, तिथे रक्षाचे शिक्षण असे सूत्रच ठरले. चेन्नई ईथे बीबीए पदवीसाठी रक्षा गेली. सध्या ती द्वितीय वर्षात शिकत आहे. चेन्नई या ठिकाणी व्हॉलीबॉलचे देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र आहे. तिथेच पदवीचे शिक्षण व खेळाचे प्रशिक्षण घेत असतांना रक्षाची निवड चीन मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. याचा संपूर्ण गावाला अतिशय आनंद झाला आहे. असे आंतरराष्ट्रीय मैदान मारणारी ती जिल्ह्यातील पहिलीच व्हॉलीबॉल खेळाडू ठरली असल्याचे पंकज अग्रवाल व गिऱ्हाळे सांगतात. या खेळात उंची ही महत्वाची ठरत असल्याने रक्षाची ६ फूट ४ इंच उंची तिच्या खेळास भरारी देणारी ठरली. तिचे कुटुंब मध्यमवर्गीय असून वडील किराणा व्यावसायिक आहे. मात्र खेळात भविष्य करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांनी रक्षाला पूर्ण प्रोत्साहन दिले. पुढे भारताच्या मुख्य संघासाठी खेळण्याचे व ऑलिम्पिक पदक खेचण्याचे ध्येय असल्याचे रक्षा सांगते.