नागपूर: समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघातात २५ प्रवाशांच्या होरपडून मृत्यू झाला होता. पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांच्या मदतीसाठी नागपुरातील संविधान चौकात १९ जानेवारीला राम नाम जप केले. रविवारी कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा होणार आहे. यावेळी मागणी मान्य न झाल्यास राम मंदीर उद्घाटनदिनी २२ जानेवारीला फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी राम नाम जप आंदोलन केले जाणार आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे चंद्रशेखर मडावी म्हणाले, अपघात पीडितांना २०० दिवसानंतरही फडणवीसांच्या घोषणेनुसार प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत मिळाली नाही. त्यामुळे नागपुरातील संविधान चौकात शुक्रवारी राम नाम जप केले. सीताबर्डी पोलिसांनी लेखी स्वरूपात फडणवीस यांच्यासोबत रविवारी बैठक करून देण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन परत घेतले. दरम्यान रविवारी कुटुंबीय देवेंद्र फडणवीस यांना भेटून न्याय मागणार आहेत.फडणवीसांसोबतच्या बैठकीतही मागणी मान्य न झाल्यास पोलिसांची परवानगी न घेताच धरमपेठ येथील त्रिकोणी पार्कमधील कार्यालय परिसरात राम नाम जप करणार असल्याचेही मडावी यांनी सांगितले. या कार्यालय असलेल्या इमारतीतच फडणवीस यांचे निवासस्थान आहे.
हेही वाचा >>>झरीजामणी येथे सेतू केंद्रांचे ‘स्टिंग ऑपरेशन’; अधिक पैसे आकारणाऱ्या दोन केंद्रांवर कारवाई
प्रकरण काय?
नागपूरहून- पुण्याला निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सचा १ जुलै २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ अपघात झाला होता. त्यात सर्वाधिक मृत वर्धा जिल्ह्यातील होते. अपघातानंतर उपमुख्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांनी दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदतीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात राज्य शासनाकडून ५ लाख व केंद्राकडून २ लाखांचीच मदत मिळाली. पीडित कुटुंबीयांनी वेळोवेळी स्थानिक आमदार, खासदार, राज्यपालांची भेट घेत मदतीची मागणी केली. मागणीमध्ये दोषी ट्रॅव्हल्स कंपनीची मान्यता रद्द करणे, अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्याही मागणीचा समावेश होता. हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी विधानसभा-लोकसभेत प्रश्न मांडला. परंतु पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे वर्धेतील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले. तेथेही न्याय मिळत नसल्याने शेवटी प्रभू श्री राम यांच्याकडे साकडे घालण्यासाठी पीडित कुटुंबीयांनी शुक्रवारी (१९ जानेवारी) फडणवीस यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयापुढे दुपारी राम नाम जपाचा निर्णय घेतला. पोलिसांनी तेथे जाऊ दिले नसल्याने संविधान चौकात हे आंदोलन झाले. आता न्याय न मिळाल्यास अयोध्या राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी फडणवीसांच्या निवासस्थान परिसरात हे आंदोलन होणार आहे, हे विशेष.