नागपूर : समाजाने दुर्लक्षित केलेल्या महिलांच्या अपत्यांचा सांभाळ करणारे ज्येष्ठ समाजसेवक रामभाऊ इंगोले सध्या आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रामभाऊंना महिनाभरापूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. त्याचा खर्च काही अज्ञात दात्यांनी उचलला. मात्र, आता त्यांना आरामाची गरज आहे. त्यात औषधीचा खर्च आहेच, शिवाय अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या ‘विमलाश्रम’च्या संचालनाचाही मोठ्या प्रमाणात खर्च आहे. रामभाऊ त्यांचा व्यवसाय करून हा विमलाश्रमाचा डोलारा सांभाळत होते. मात्र आता प्रकृती अस्वस्थ असल्याने तो ही बंद पडला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींकडून त्यांना आर्थिक मदतीची आज गरज आहे.

हेही वाचा – प्रचाराच्या रणधुमाळीत व्यक्तिगत टीका, टिप्पणीपासून ‘हा’ नेता अलिप्त

‘आम्ही युवा’ या संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे. समाजाने एकत्र येऊन समाजकार्य करणार्‍या रामभाऊ इंगोले यांना मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही युवा संघटना त्यांच्यासोबत उभी आहे. ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी रामकृष्ण डोमाजी इंगोले, A/C क्रमांक 257210100005330 त्यांचा IFSC कोड UBIN0825727 आहे. त्याचा पिन कोड 440015 आहे. link- https://bit.ly/SupportRambhauIngole

हेही वाचा – नागपूर : रेल्वे तिकीट तपासणीस अल्फिया पठाण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये चमकली

४०-४५ वर्षांपासून सांभाळ

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत नागपुरातील ‘गंगा-जमुना’ या बदनाम वस्तीत जाऊन तेथील देहविक्रय करणार्‍या महिलांकडून राखी बांधून घेतली होती. त्यात रामभाऊ इंगोले यांचाही समावेश होता. आपण या आपल्या दुर्दैवी भगिनींसाठी काय करू शकतो, असा विचार रात्रभर केल्यावर त्यांनी सकाळी या वस्तीतील महिलांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेली ४०-५० वर्षे रामभाऊ अनेक संकटांवर मात करून या मुला-मुलींचा सांभाळ करीत आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी विवाह केला नाही. वडिलोपार्जित आणि स्वकष्टाजिंत संपत्तीही याच कामी खर्च केली. या कामासाठी त्यांनी कधीही कुणाकडून मदत मागितली नाही. शासनाकडून मदत घेतलेली नाही. अनेक छोटे-मोठे व्यवसाय करून आणि काही मित्रांनी, सहृदय लोकांनी केलेल्या मदतीवरच त्यांनी हा डोलारा सांभाळला आहे. सततचा आर्थिक ताण, ती मुले- मुली वयात आल्यावर त्या वस्तीतून त्यांना परत नेण्यासाठी होणार्‍या बळजोरीचा ताण यामुळे त्यांना मधुमेह आणि बीपीचा त्रास अनेक वर्षांपासून जडला होता. आता हे जीवावरचेच दुखणे आल्याने त्यांची आर्थिक बाजू बघता आणि संपूर्ण विमलाश्रमाची त्यांच्यावर असलेली जबाबदारी बघता रामभाऊंना आर्थिक संकटांना सामना करावा लागतो आहे. त्यामुळे समाजातील दानदात्यांनी रामभाऊच्या या कार्यासाठी आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती आम्ही युवा या संघटनेने केली आहे.

Story img Loader