डॉ. रामभाऊ तुपकरी यांची कबुली;‘आरएसएस व्हॅल्युड’चे उद्या प्रकाशन
नागपूर : वीस वर्षांपूर्वी संघ सोडला, पण संघाने मला सोडलेले नाही. संघाची सैद्धांतिक मांडणी मला मान्य आहे, मात्र त्या सिद्धांतांची मोडतोड करणाऱ्यांच्या त्रासामुळे मी संघातून बाहेर पडलो, असे प्रतिपादन व्हीएनआयटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. रामभाऊ तुपकरी यांनी पत्रकार परिषदेत केले.
तुपकरी यांचे ‘आरएसएस व्हॅल्युड’या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १९ जानेवारीला दुपारी ४ ते ६ या वेळेत धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख पुस्तकाचे प्रकाशन करणार असून यावेळी डॉ. तुपकरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्याच्या पाश्र्वभूमीवर डॉ. तुपकारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. ‘आरएसएस व्हॅल्युड’ एक संशोधनात्मक दस्तऐवज आहे. संघातील चांगल्या बाबींचे कौतुक करायला काहीच हरकत नाही, पण वाईट गोष्टीही आहेत. इंग्लंडमधील प्रसिद्ध तत्त्वज्ञ अरनॉल्ड टॉयनबी यांची ‘क्रिएटिव्ह मायनॉरिटी’ही संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी उचलली. डॉ. हेडगेवारांनी ३ टक्के विद्वानांच्या मागे ९० टक्के समाज असावा असे सूत्र घालून दिले. मात्र, संघात तीन टक्के तर सोडाच पण अर्धा टक्का तरी विद्वान आहेत का? असा प्रश्न पडतो. ‘वसुधैव कुटुंब कम’ किंवा इतरही संघाचे सिद्धांत आहेत. पण अनेक सिद्धांताला व्यवस्थेतील लोक वाटाण्याच्या अक्षता लावतात. त्यामुळेच मीच नव्हे अनेक लोक संघातून बाहेर पडले. काहींना काढून टाकण्यात आले. त्यावर कोणी काही बोलले नाही की लिहिले नाही. मात्र, मी अपवाद आहे. संघाच्या कार्यपद्धतीवरील नापसंती ‘तो राजहंस एक’या आत्मचरित्रात लिहिली आहे. त्यापुढील संशोधन ‘आरएसएस व्हॅल्युड’ पुस्तकात आले आहे.
संघाच्या बैठकीसाठी बोलावले
२४ नोव्हेंबरला संघाच्या बैठकीत मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलावले होते. त्यात आरएसएस प्रमुख मोहन भागवतही होते. ‘तो राजहंस एक’ या आत्मचरित्राचा आणि ‘आरएसएस व्हॅल्युड’या पुस्तकाची माहिती सभेत दिली. संघ सोडला म्हणून किंवा संघाच्या विरोधात लिहिले म्हणून धमकी वगैरे असे काहीही आले नाही. उलट पुस्तकाची पहिली प्रत मोहन भागवतांना भेट दिल्याचे तुपकरी म्हणाले.