नागपूर : संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर युवकांमध्ये संताप होता. त्यांनी जाळपोळ केली असेल, परंतु कुठलीही जीवितहानी झाली नाही. असे असतानाही केवळ आंदोलन केले म्हणून त्यांना पकडून मारहाण करणे चुकीचे आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला, असा थेट आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रालय असतानाही आतापर्यंत परभणी घटनेवर ठोस कारवाई झाली नसून यासंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहे, असेही आठवले म्हणाले.
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराची भेट घेतली होती. यावेळी त्यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला, असा आरोप केला होता. आठवलेंच्या आरोपामुळे त्याला दुजोरा मिळाला आहे. नागपूर आणि अमरावती विभागाच्या कार्यकर्ता आढावा बैठकीच्या निमित्ताने नागपूरला आले असता आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा >>>सावरकरांनंतर आता नरेंद्र दाभोलकरांच्या नावासाठी आग्रह; उद्घाटनीय स्थळाला नाव देण्याची ‘अंनिस’ची मागणी
सूर्यवंशी व वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे, असे आठवले म्हणाले.
अमित शहांच्या वक्तव्यावर टाळाटाळ
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. आंबेडकर संदर्भातील वक्तव्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केला. यासंदर्भात आठवलेंना प्रश्न केला असता त्यांनी यावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली. बाबासाहेबांना काँग्रेसने पराभूत केले असे शहांना म्हणायचे होते. त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. त्यामुळे यावर टीका करणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले.