रामदास आठवले यांचे मत
भाजप-शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवर अंतर्गत वैचारिक वाद सुरू आहेत, ते थांबविले पाहिजे. अन्यथा दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अशीच भूमिका कायम ठेवली आणि त्यात जर शिवसेनेने पाठिंबा काढला, सत्ता गेली तर राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार नाही, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने रामदास आठवले नागपुरात आले असताना त्यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले. त्यावेळी भाजपला चांगले यश मिळाले. शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या असताना आघाडी सरकारला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी माझी भूमिका होती. त्याप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीची सत्ता आल्यानंतर गेल्या वर्षभराच्या काळात दोन्ही पक्षांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद आणि टीका केली जात आहे. त्याचा परिणाम दोन्ही पक्षांवर आणि जनतेवर होत आहे. घटक पक्षांवर त्यांच्या वादाचा काही परिणाम नाही. मात्र, असेच जर चालू राहिले आणि शिवसेनेने पाठिंबा काढून घेण्याचा विचार केला तर राज्यात पुन्हा सत्ता येण्याची काहीच चिन्हे नाही. आघाडी सरकारला जनता कंटाळली म्हणून भाजप शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला होता. मात्र, एक वर्षांनंतर जर वाद संपत नसेल तर राज्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे आठवले म्हणाले.
रिपब्लिकन ऐक्यांसाठी प्रयत्न केला असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला रिपब्लिकन पक्ष स्थापन करू शकलो नाही, अशी खंत आहे. तरी अजूनही वेळ गेली नाही. केवळ दलितांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची ओळख न राहता सर्व जाती धर्मातील लोकांचा सर्वसमावेशक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष स्थापन व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विविध राजकीय पक्षाच्या सोबत जाणे ही रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची मानसिकता होती त्यामुळे आमचे सर्व नेते वेगवेगळ्या पक्षांशी आणि त्यांच्या विचारांशी जुळले गेले. आता सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये आमची ताकद निर्माण झाली आहे. रिपब्लिकन ऐक्य झाले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढू शकतील. राज्य आणि देश पातळीवर त्याला वेळ लागेल. मात्र, स्थाानिक पातळीवर रिपब्लिकन पक्ष म्हणून स्वतंत्र निवडणूक लढण्यास काहीच हरकत नाही आणि तसे प्रयत्न केले जाईल, असेही आठवले यांनी सांगितले.
एकीकरणामध्ये नेतृत्व कोणी करावे असा वाद असेल तर मला नेतृत्व नको. प्रकाश आंबेडकर किंवा कोणीही नेतृत्व केले तरी चालेल. मात्र, एकीकरण होणे ही आज काळाची गरज आणि समाजाला त्यामुळे न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात आणि केंद्रात आम्ही सहभागी झाल्यानंतर केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तसे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष झाले तरी ते आश्वासन पाळले नाही. अजूनही अपेक्षा आहे. राज्यात महामंडळावर आमच्या पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना स्थान मिळावे अशी अपेक्षा आहे. आमच्या कार्यकत्यार्ंचा सन्मान झाला पाहिजे, एवढी अपेक्षा ठेवणे गैर आहे का आणि तसे जर होत नसेल तर पुढे काय करावे हे येणाऱ्या काळात ठरवू. मात्र, आज आम्ही सरकारसोबत आहोत. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघााडीला बहुमत मिळेल. त्या ठिकाणी प्रचाराला जाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
सेनेने पाठिंबा काढल्यास राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार नाही
भाजप-शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवर अंतर्गत वैचारिक वाद सुरू आहेत
Written by मंदार गुरव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-10-2015 at 05:46 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale said if cena break alliance not possible bjp won next time