बुलढाणा : घरची जेमतेम परिस्थिती, पडके घर, दारिद्र्य व संकटांशी सामना रोजचाच खेळ, भाजीपाला विक्री हेच कुटुंबाच्या पोट भरण्याचे साधन, अशी सगळी विपरीत स्थिती. मात्र, या संकटांचा सामना करीत ‘त्यांनी’ काव्यनिर्मितीचा ध्यास कायम जपला. आज त्यांना साहित्य साधनेबद्दल जीवनातील दहावा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रामदास कोरडे असे या जेमतेम पन्नाशितील कवीचे नाव. साखरखेर्डा (सिंदखेडराजा) ही त्यांची जन्म व कर्मभूमी. ऐतिहासिक, आध्यात्मिक वारसा लाभलेल्या या नगरीला साहित्य संस्कृतीचीदेखील परंपरा आहे. हा वारसा चालवणाऱ्या कवी कोरडे यांना आज शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगावचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘बंध रेशमाचे’ या काव्यसंग्रहासाठी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार त्यांना मिळाला आहे. फाउंडेशनचे राज्यसचिव प्रा. डॉ. सुभाष बागल यांनी हा पुरस्कार घोषित केला आहे. यापूर्वी माळी महासंघाच्या समाजभूषण पुरस्कारासह नऊ पुरस्कार त्यांच्या खात्यात जमा आहेत.
हेही वाचा – ‘समृद्धी’वर माशांचा खच! मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड
हेही वाचा – आकाशात विलोभनीय चंद्रकोर आणि शुक्राची दुर्मिळ युती
शेतकऱ्यांच्या वेदना शब्दबद्ध करताना ‘त्यांना मरायचे नाही लढायचे’ असा संदेश कवी कोरडे देतात. विविध काव्य संमेलनात त्यांनी आपल्या रचना सादर केल्या आहेत. त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे.