लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : लोकसभा निवडणुकीची मत मोजणी सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहे. उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. मतमोजणी यंत्रणा सज्ज झाली असून अखेरचा आढावा घेणे सुरू आहे.

या अनुषंगाने प्रमुख उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे दिसून आले. भाजपचे उमेदवार रामदास तडस हे उदया काय निकाल लागणार याबाबत आश्वस्त असल्याचे दिसून आले. मी हॅटट्रिक पूर्ण करणार, असा ते दावा करतात. उद्या सकाळी देवळी तालुक्यातील एकपाळा येथील हनुमान मंदिरात जाणार. हा मारोती नेहमी पावतो, असा मला विश्वास आहे. दर्शन घेऊन वर्धा येथील कार्यालयात बसणार. इथे पक्ष सहकाऱ्यासोबत बसून वर्धा तसेच देशभरातील मत मोजणीचा आनंद घेणार. गत दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक थोडी त्रासाची ठरली. पण, विजयी कमळच होणार. मतदान चाचण्या देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार, हे स्पष्ट करीत आहे. त्यात वर्धा लोकसभा मतदारसंघ राहणार. आम्हीच गुलाल उधळणार, असा विश्वास रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात,‘जनतेच्या आशीर्वादाने लोकसभा जिंकणार’

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे म्हणाले, की मी शंभर नव्हे तर दोनशे टक्के विजयी होणार असल्याची खात्री बाळगतो. वर्धाच नव्हे तर सर्वत्र महाआघाडी विजयी होणार. आज सायंकाळी मोजणी प्रतिनिधीचे शिबीर आहे. त्यात सहभागी होणार. रात्री सहकारी नेते व कार्यकर्त्या मंडळी सोबत चर्चा व जेवण करणार. मुक्कामीच राहणार. त्यानंतर आर्वीत लहानूजी महाराज देवस्थान व अन्य ठिकाणी आशीर्वाद घेणार. घरून आई वडिलांच्या प्रतिमेस पुष्प वाहून वर्ध्यात येणार. बहुतेक मत मोजणीचे दोन तीन राऊंड झाल्यावरच येईल. चाचण्या काहीही सांगो, पण मतदारराजा आम्हालाच कौल देणार, असा आत्मविश्वास आहे. यावेळी जनतेनेच आमच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. जनतेत परिवर्तनाची किती लाट होती, हे दिसेल. गुलाल आम्हीच उधळणार, असा विश्वास अमर काळे यांनी व्यक्त केला.

वर्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रामदास तडस व अमर काळे यांच्यातच दुहेरी लढत झाल्याचे जाहीर चित्र होते. त्यामुळे अशा या दुहेरी लढतीने व वाढलेल्या साडे तीन टक्के मतदानामुळे उदया ४ जूनला अवघ्या वर्धा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas tadas and amar kale both claim about victory in vardha pmd 64 mrj
Show comments