लोकसत्ता टीम
वर्धा : भाजपच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा म्हणजे तुरूपचा एक्का समजली जाते. मतदारसंघात त्यांचे आगमन झाले की पावले, अशी मानसिकता भाजप उमेदवार ठेवून असतो. वर्धा मतदारसंघातही आता तसेच वातावरण आहे. वरिष्ठ पातळीवरून निरोप आला की पंतप्रधान मोदी हे वर्ध्यात सभा घेऊ शकतात. तयारी ठेवा. पण अधिकृत दौरा आलेला नसल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.
साधारणपणे मोदी हे दोन किंवा तीन लोकसभा मतदारसंघ मिळून एक सभा घेतात. स्थळ तसेच निवडले जाते. विदर्भात ते यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथे त्यांची सभा होणार आहे. यापुढेही त्यांचे पाऊल परत विदर्भात पडू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पूर्वीच्या दोन निवडणुकीत मोदी वर्ध्यात येऊन गेले. रामदास तडस हे त्यांचे दोन्ही विजय मोदींच्या पदरात टाकतात. मात्र यावेळी ते अगदी पहिल्या टप्प्यात नेहमीप्रमाणे न आल्याने शंका व्यक्त केल्या जात आहेत. तडस खात्री देतात की वर्ध्यात सभा होणारच. मात्र अधिकृत दौरा आला नसून तयारीत राहण्याची सूचना अ आल्याचे प्रचार प्रमुख सुमित वानखेडे यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-उमेदवारांचं चांगभलं! प्रचार साहित्याच्या दरात अखेर कपात; लोकसभा निवडणुकीत…
दोन किंवा तीन लोकसभा मतदारसंघात प्रभाव निर्माण होईल, अशी सभा स्थळ असणे अपेक्षित आहे. म्हणून वर्धा अमरावती महामार्गलगत तळेगाव येथे सभास्थळ नियोजित आहे. कारण वर्धा सोबतच अमरावती मतदारसंघ या गावास लागून आहे. तसेच या मार्गावरील काटोल हे क्षेत्र लागून आहे. असे लक्षात घेऊन नियोजन करणे सूरू असल्याचे सांगण्यात आले. वर्धा अमरावती मतदारसंघात भाजप पुढे कडवे आव्हान असल्याचे भाजप नेते मानतात.