वर्धा :मंदीर प्रवेश नाकारण्याचे कृत्य आता देशभर गाजू लागले आहे. रामनवमीस व ते सुद्धा भाजपचा स्थापना दिन साजरा होत असतांना भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना वाईट अनुभव आला. देवळी त्यांचा गढ समजल्या जात असतांना देवळीतील जुने मंदीर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध राम मंदिरात तडस यांना गाभाऱ्यात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता.ही बाब उजेडात आणताच सर्वत्र संताप व्यक्त करणे सूरू झाले.
रामदास तडस हे पत्नीसह मंदिरात पोहचले. त्यावेळी पुजारी प्रा. मुकुंद चौधरी यांनी त्यांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही, तुम्ही जानवे व सोहळं घातलेले नाही. दूर व्हा, असे बजावले. नाराज तडस यांनी केलेली विनंती नाकरण्यात आल्याने शेवटी तडस यांनी समोर असलेल्या संत गणपतराव महाराज यांच्या समाधीस हार घालून विमनस्क स्थितीत मंदीर सोडले. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले.
तडस म्हणतात आम्ही पवित्र मनाने आस्था ठेवून गेलो. पण नकार दिला म्हणून किमान हातातील हार देत तो मूर्तीस घालण्याची विनंती केली. पण ते अडून राहल्याने परत फिरलो.येथील भाजप आमदार राजेश बकाने हे म्हणाले की लोकसत्ताची बातमी वाचताच तीळपापड उडाला. हे काय लावलं, अशी भावना झाली. मंदिरात गेलो. आडव्या हाताने जाब विचारला. मंदिराचा कारभार कसा चालतो, हे माहीत आहे.
तक्रारी असतात पण धार्मिक बाब संबंधित लोकांनीच सोडवावी म्हणून दुर्लक्ष करतो. पण हे अतीच झालंय. मंदिराची २०० एकर जमीन आहे. त्यात अनियमितता असल्याचे कळते. आता त्याचे ऑडिट लावून हिशोब मागणार. कारण कोणतेही असो, पण मंदिरात प्रवेश नाही ही बाब आताच्या युगात खपवून घेऊच शकत नाही. लोकांना सोहळं घालायला सांगतात. पण स्वतः पुजारी चमड्याच्या बेल्ट घालून मंदिरात असलेले मी पाहले. मग तेव्हा यांचा सोवळेपणा कुठे जातो, असा सवाल आमदार बकाने यांनी केला.
आमदार बकाने यांनी जाब विचारणे सूरू केले तेव्हा काही विश्वस्त मंडळींनी अरेरावी केल्याचे आमदार सांगतात. प्रभू रामचंद्र यांचे हे मंदीर अनेकांनी दान दिल्याने प्रसिद्धीस पावले. मंदीर देवस्थानाचे अध्यक्ष व काही विश्वस्त बाहेरगावीच राहतात. म्हणून काही कारभारी मालकाच्या तोऱ्यात मंदीर व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. गावातील व्यापारी व रामभक्तांच्या मदतीतून मंदीर सौंदर्यकरण होते. खुद्द तडस यांनी अनेकवेळा या मंदिरास मदत केली असल्याचे नमूद केले. मंदीर हा आस्थेचा भाग आहे. ती जपल्या गेली पाहिजे.
© The Indian Express (P) Ltd