इंग्लंडमधील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे व भारतातील डॉक्टरांसह परिचारिकांना रोजगारासह जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची इंग्लंडला चांगली सोय करण्यासाठी ब्रिटिश असोसिएशन ऑफ पीपल्स विथ इंडियन (बापीओ)कडून प्रयत्न होतात. त्यानुसार वर्षाला भारतातील पाच हजार परिचारिकांना इंग्लंडमध्ये संधी दिली जाईल, अशी घोषणा बापीओचे संस्थापक व काॅमनवेल्थ असोसिएशन फाॅर हेल्थ ॲन्ड डिसॅबिलिटी (काॅमहाड)चे नवनीयुक्त अध्यक्ष डॉ. रमेश मेहता यांनी दिली.
हेही वाचा >>>नागपूर : घर देता का घर? मिहान प्रकल्पग्रस्त, शेतकरी अद्यापही वाऱ्यावर
नागपुरातील प्रेस क्लबमध्ये मंगळवारी डॉ. मेहता यांना ‘काॅमहाड’च्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली गेली. यावेळी पत्रकार परिषदेत मेहता म्हणाले, सध्या इंग्लंडमध्ये ३० हजार भारतीय परिचारिका व ६० हजार ते ८० हजारांच्या जवळपास डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यामुळे तेथे भारतीय डॉक्टर-परिचारिकांबाबत नागरिकांमध्ये आदर आहे. इंग्लंडला आजही डॉक्टर, परिचारिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे इंग्लंडच्या नागिरकांना चांगली वैद्यकीय सेवा व भारतातील डॉक्टर, परिचारिकांना रोजगाराची संधी देण्यासाठी ‘बापीओ’ व ‘काॅमहाड’ प्रयत्न करेल. त्यानुसार इंग्लंडला वर्षाला ५ हजार भारतीय परिचारिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केली जाईल. त्यासाठी प्रथम देशाच्या विविध भागात विशिष्ट निवड पद्धती राबवली जाईल. यात निवड झालेल्या परिचारिकांना इंग्लंडमध्ये प्रवेशपूर्व परीक्षा द्यावी लागेल. त्यात निवड झालेल्या परिचारिकेला तेथे रोजगाराची संधी मिळेल.