करोनाबाधित युवकाच्या मृत्यूनंतर नवा ‘हॉटस्पॉट’ ठरण्याचा धोका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर :  सतरंजीपुरा व मोमीनपुरानंतर बुधवारी रामेश्वरीतील पार्वतीनगरात एका करोनाबाधित युवकाच्या मृत्यूनंतर एक नवा परिसर हॉटस्पॉट ठरण्याचा धोका आहे. त्या दृष्टीने मृताचे निवासस्थान असलेला परिसर बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यापूर्वी परिसरातील अनेक लोकांनी भीतीमुळे स्वयंस्फूर्तीने गल्लीबोळात लाकडी कठडे लावत परिसर बंद केला आहे. परिसरात मृताच्या कुटुंबासह आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचे विलगीकरण करून त्यांना नेण्यात आले. त्यांना भेटायला येणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. हा युवक तंबाखूची चाळ भागात मित्रांसोबत दिवसभर वेळ घालवायचा. त्याला गेल्या वर्षभरापासून सर्दी खोकल्याचा त्रास होता. मात्र त्याने दुर्लक्ष केले. युवकाच्या मृत्यूमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रभाग क्रमांक ३५ मध्ये हा भाग येत असून त्यात पार्वतीनगर, जोगीनगर, जयभीमनगर, धारीवाल लेआऊट, रामेश्वरी, काशीनगर हा भाग येतो. येथील लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले. जे बाहेर गेले त्यांना तात्काळ घरी येण्याच्या सूचना करण्यात आल्या. रामेश्वरी व द्वारकानगरातील अनेक लोकांनी घरे बंद करून शहरातील नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. मृताचे काका पोलीस विभागात तर दुसरे  काका वकील आहे. त्यांना सुद्धा विलगीकरणात नेण्यात आले. मृत युवक गेल्या आठ ते दहा दिवसात कोणा कोणाच्या संपर्कात आला आहे त्याचा शोध घेतला जात आहे.

झोपडपट्टय़ांना सर्तकतेचा इशारा

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरासह इतरही भागातील  झोपडपट्टय़ांवर प्रशासनाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. झोपडपट्टीतील लोकांचा बाहेर वाढलेला वावर बघता या ठिकाणी सुरक्षेसाठी कठडे लावून परिसर बंद केले जात असून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात ६४० नोंदणीकृत झोपडपट्टय़ा असून त्यातील बहुतांश या मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरात आहे. गेल्या काही दिवसात सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा हे करोनाबाधित रुग्णांच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरलेल्या परिसराला लागून मध्य व पूर्व नागपुरात ५८ झोपडपट्टी आहेत. त्यातील नंदनवन, डिप्टी सिग्नल, शिवाजीनगर, पारडी, शांतीनगर, पाचपावली या भागातील बहुतांश झोपडपट्टीत मजूर रोजंदारीवर काम करणारा मजूरवर्ग राहतो. शिवाय घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिसऱ्या टाळेबंदीनंतर बहुतांश लोक कामासाठी बाहेर पडू लागले असताना प्रादुर्भाव होण्याची शक्यता बघता महापालिकेने हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरातील झोपडपट्टीवर लक्ष केंद्रित केले आहे. नंदनवन परिसरातील झोपडपट्टीत ३०० घरे असून यातील अनेक घरामध्ये परप्रांतीय युवकांची संख्या आहे. भांडेवाडी परिसरात २५० च्या जवळपास घरे असून तेथेही छत्तीसगड व मध्यप्रदेशातून कामासाठी आलेले अनेक कुटुंब राहतात. हा परिसर बंद केला जात आहे.  सतरंजीपुरापासून १ किमी असलेल्या डिप्टी सिग्नल भागात सुरक्षा वाढवण्यासोबतच स्वच्छतेच्या दृष्टीने फवारणी व निर्जंतुकीकरण केले जात आहे.

पोलिसांना हॉटेल व्यावसायिकाचा नकार

विलगीकरणात जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. बुधवारी बेलतरोडीतील सात पोलिसांना बैद्यनाथ चौकातील एका हॉटेलमध्ये विलगीकरणासाठी पोलीस प्रशासनाने संपर्क साधला असता, कर्मचाऱ्यांचे नकारात्मक अहवाल असतील तरच त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

११ पोलीस संस्थात्मक विलगीकरणात

करोनामुळे एकाचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत ७ आणि अजनी पोलीस ठाण्यातील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृताचे सख्खे काका पोलीस दलात असून ते बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या संपर्कात सात पोलीस कर्मचारी आले. तसेच तरुणाच्या मृत्यूनंतर मंगळवारी रात्री अजनी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी शासकीय प्रक्रिया पूर्ण करीत होते. या सर्वाना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनाही विलगीकरणात जावे लागेल, अशी शक्यता आहे.

‘मेयो, मेडिकलमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवा’

आपल्या मूळ गावी परतण्यासाठी स्थलांतरित कामगारांकडून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्याकरिता मेयो व मेडिकल परिसरात मोठय़ा प्रमाणात कामगार गर्दी करीत आहेत. त्यामुळे या रुग्णालयांच्या परिसरात पोलिसांनी योग्य बंदोबस्त वाढवावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.  उच्च न्यायालयात दाखल याचिकेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी न्या. अनिल किलोर यांनी रुग्णालयासमोर योग्य पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा व कामगारांची गर्दी नियंत्रित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले.

करोनाने दगावणाऱ्यावर प्रथमच अग्निसंस्कार

उपराजधानीत मंगळवारी दगावलेल्या पार्वतीनगर येथील २२ वर्षीय करोनाग्रस्ताचा अंत्यविधी बुधवारी मोक्षधाम घाट येथे दहनविधीतून करण्यात आला. पूर्वी शहरातील सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा परिसरातील प्रत्येकी एक अशा दोघांचा अंत्यविधी दफनिविधीतून करण्यात आला होता. अंत्यविधी करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संसर्ग टाळण्यासाठी पूर्ण काळजी घेतली असून नातेवाईकांपैकी केवळ तीन जणच हजर होते. करोना संशयित म्हणून मंगळवारी मेडिकलला आलेल्या तरुणाचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्याच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीला पाठवून मृतदेह चार पदरी प्लास्टिकमध्ये गुंडाळून येथील शीतगृहात ठेवला.महापालिकेच्या आरोग्य विभागने संसर्गाचा धोका सांगितल्यामुळे अंत्यविधीसाठी केवळ तीनच नातेवाईक मोक्षधाम घाटावर पोहचले, तर महापालिकेचेही निवडक अधिकारी खबरदारी म्हणून येथे उपस्थित होते. त्यानंतर येथे दाहसंस्कार झाले.