वर्धा : राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन तासभराचा कालावधी लोटत नाही तोच एक मंत्री अडचणीत सापडला. सर्व मंत्री शपथ घेऊन थांबले. नंतर रामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक लगेच बोलावल्याचा निरोप सर्व नवनियुक्त मंत्र्यांना गेला. आणि लगबग उडाली. रामगिरीवार पोहचायचे कसे ते!
कारण लाल दिव्याच्या गाड्या अद्याप तैनात व्हायच्याच होत्या. म्हणून मग मिळेल त्या वाहनाने सर्व मंत्री तडक रवाना झाले. एक मात्र अडकले. राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले डॉ. पंकज भोयर यांना वाहन मिळता मिळेना. ते तसेच रस्त्यावर उभे. गाडीची वाट बघत. तेवढ्यात वरिष्ठ माहिती अधिकारी अनिल गडेकर व निवृत्त माहिती संचालक शरद चौधरी हे खात्याच्या गाडीने निघाले होते. तेव्हा त्यांना मंत्री डॉ. पंकज भोयर हे गाडीची वाट बघत तिष्ठट उभे असलेले दिसले. विचारपूस करताच गांभीर्य लक्षात आले. आणि मग गडेकर यांची विनंती मान्य करीत डॉ. भोयर त्यांच्या गाडीत जाऊन बसले. गाडी वेगात निघाली. रस्त्यात वाहतूक गर्दी. पण काशीबाशी वाट काढत शेवटी माहिती विभागाचे वाहन रामगिरीवर पोहोचलेच.
हेही वाचा – अकोला व वाशीम जिल्ह्याची पुन्हा उपेक्षा; मंत्रिमंडळात दोन्ही जिल्ह्याला स्थान नाहीच
हेही वाचा – मंत्रिमंडळाचा अखेर शपथविधी; ४३ पैकी एक मंत्रीपद अद्याप रिक्त
मंत्री भोयर लगबग करीत बैठकीत पोहोचले. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत अश्या वाहनाने व सर्वात शेवटी पोहोचणारे डॉ. भोयर हे एकमेव ठरले. राज्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या डॉ. भोयर यांच्या शपथविधीसाठी आज त्यांचे वडील प्राचार्य डॉ. राजेश भोयर, आई कांचनताई, पत्नी शीतल व कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच वर्ध्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसेच स्नेही नागपुरात आले होते. मात्र सर्वांना शपथविधी सोहळ्यास हजर राहता आले नाही. पण त्यांना नाराज करायचे नाही म्हणून मग वर्धा रोडवरील एका सभागृहात एकत्रित होण्याचा निर्णय वेळेवर घेण्यात आला. सर्व उपस्थित झाल्यावर मंत्री भोयर पण तिथे पोहोचले. येथे उपस्थित प्रत्येकास शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही याबद्दल खंत व्यक्त करीत मंत्री भोयर यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच जेवण केल्याशिवाय कोणीही वर्धेला परत जाऊ नये, अशी विनंती पण केली. आजचा शपथविधी वर्धेकर मंडळींसाठी प्रथम धक्कादायी व मग आनंददायी ठरला. वर्ध्याचा आमदार अडीच तप लोटल्यावर मंत्री झाला होता, हे त्यामागचे कारण. यापूर्वीप्रमोद शेंडे हे मंत्री राहून चुकले होते.