नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चिंता वाढली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी निघालेल्या मुळक यांच्या रॅलीत रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, रश्मी बर्वे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

रामटेक विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने रामटेक सोडण्यास नकार दिला. हा मतदारसंघ सोडावा व राजेंद्र मुळक यांना उमेदवारी द्यावी यासाठी शेवटपर्यंत नेत्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. परंतु, काँग्रेसला यात यश आले नाही. शेवटी राजेंद्र मुळक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार बर्वे हे जिल्ह्याचे काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचे कट्टर समर्थक आहेत. हे बघता रामटेकमध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात बंड पुकारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हेही वाचा >>>धनत्रयोदशीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठे बदल; उच्चांकी दरामुळे..

उद्धव ठाकरेंची घेतली होती भेट

रामटेकची जागा शिवसेनेकडे गेल्यावर राजेंद्र मुळक व सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करण्यात आली. ठाकरेंना अनेकदा यासाठी विनवनीही करण्यात आली. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाटाघाटी सुरू असताना मुळक यांच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे राजी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. स्वतः मुळकसुद्धा आशेवर होते. मात्र, यात यश न आल्याने अखेर मुळक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीमध्ये खासदार बर्वे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने शिवसेनेची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>अरेच्चा! पक्ष एक अन् उमेदवार दोन; आता पुढे काय?

दहा वर्षांपासून रामटेक मतदारसंघाची बांधणी

राजेंद्र मुळक हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. ते मुख्यमंत्री असताना मुळक अर्थराज्यमंत्री होते. सर्वप्रथम मुळक हे उमरेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या पुनर्चनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. नंतर मुळक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. मात्र, ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी रामटेक मतदारसंघाची निवड केली. दहा वर्षांपासून या मतदारसंघात त्यांनी काँग्रेसची बांधणी केली.