राजेश्वर ठाकरे
नागपूर : शिवसेनेच्या फुटीनंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात गेले असले तरी जिल्ह्यातील बहुतांश शिवसैनिक मात्र ठाकरे गटासोबतच असल्याने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तुमाने यांच्यापुढे ही जागा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथून विद्यमान खासदार कृपाल तुमाने दोनदा विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळी प्रारंभी तळ्यात-मळ्यात भूमिका घेणारे कृपाल तुमाने नंतर शिंदे गटासोबत गेले. सेनेतील फुटीनंतर होणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय प्राप्त करून ते हॅट्ट्रिक’ करतील की फुटीचा फटका त्यांना बसेल याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा >>> जमाखर्च : अतुल सावे; ‘सहकार’ सोडून सारे काही!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तुमाने यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांचा सव्वा लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. तेव्हा शिवसेना एकसंघ होती व सेनेची भाजपशी युती होती. लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाही मतदारसंघातून त्यांना आघाडी मिळाली होती. यापैकी रामटेक, उमरेड, कामठी आणि हिंगणा हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होते तर काटोल, सावनेरमध्ये अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेसचे आमदार होते. तुमाने यांना हिंगण्यातून १ लाख ५ हजार ६०३, उमरेडमध्ये ९३ हजार ६४८, कामठीमध्ये १ लाख २३ हजार ८९५ आणि रामटेकमध्ये ९३ हजार १९६ मते मिळाली होती.
हेही वाचा >>> जमाखर्च : शंभूराज देसाई; कामापेक्षा वादच जास्त
आता शिवसेनेत फूट पडली असून तुमाने शिंदेंसोबत गेले आहेत. मात्र मूळ शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. मतदारसंघातील सावनेर, काटोलसह उमरेड या विधानसभेचे तीन मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार आहेत. भाजपची शिंदे गटासोबत युती असली तरी भाजपचा रामटेकच्या जागेवर डोळा आहे. या पार्श्वभूमीवर २०२४ ची लोकसभा निवडणूक तुमानेंसाठी सोपी नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.