नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदाराला डावलून भाजपाने लादलेले उमेदवार देण्यात आल्याने शिवसेनेत खदखद असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर खुद्द विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी तिला वाट मोकळी करून दिली. शिवसेना फुटल्यानंतर खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. परंतु भाजपाने लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरवण्यावरून प्रचंड दबाव एकनाथ शिंदे यांच्यावर निर्माण केला आहे. त्यामुळे ते विद्यमान खासदारांना देखील उमेदवारी देऊ शकत नव्हते . शिंदे सेनेपुढे एकतर उमेदवार बदलण्याचे किंवा भाजप ज्याचे नाव सुचवेल, त्याला उमेदवारी देणे हे दोनच पर्याय होते. त्यामुळे शिंदे सेनेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्याचा प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपुरातील देशपांडे सभागृहात आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आला, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
तुमाने यांनी उमेदवारी नाकारल्याचे दु:ख व्यक्त करताना २०१९ ची निवडणूक आपण याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकून दाखवली होती. मात्र, यावेळी काही लोकांनी साहेबांना सांगितले की, तुमच्याकडे लोक नाहीत. संघटना नाही. तुमाने हे घरातच बसले आहेत. काँग्रेसचे केंद्रीय नेते मुकुल वासनिक यांना हरवून मी निवडून आलो होतो. आता तर स्पर्धाच नव्हती. मी एक लाखावर मतांनी निवडून आलो असतो, अशा शब्दात तुमाने यांनी भाजपाच्या दबावतंत्रावर नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
तुमाने यांनी भाजपाच्या विस्तारवादी वृत्तीवरही टीका केली. ते म्हणाले, लोक आमच्या सोबत राहतात. मजबूत होतात व नंतर ते आमच्या लोकांना घेऊन पळतात. त्यामुळे आमचा पक्ष डाऊन होतो. साहेबांच्या मनात काय होते, हे मला माहीत आहे. मी हे सर्व पाहत होतो. साहेब माझ्यासाठी शेवटपर्यंत लढत होते; पण त्यांच्यावर दबाव होता, म्हणून मी मागे हटलो. साहेब म्हणाले, पक्षासाठी काम करा. होळीचा दिवस होता; पण आपण होळीचा सण साजरा केला नाही. मनात दुःख होते. तुमाने पुढे म्हणाले, त्यांना (भाजपला ) आपली ताकद दाखवा. आपला पक्ष जिवंत आहे, हे दाखवा, असा टोलाही तुमाने यांनी लगावला.