नागपूर : रामझुला हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका मालू हिची पोलीस कोठडी प्राप्त करण्यात सीआयडीला अखेर यश मिळाले. नागपूर सत्र न्यायालयाने सोमवारी सीआयडीने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर निर्णय देत रितिका हिला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. उल्लेखनीय आहे की प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी मालू हिला पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठ़डी दिली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास तहसील पोलिसांकडून सीआयडीकडे देण्यात आला. यानंतर वेगाने घटना घडल्या आणि अखेर रितिका हिला अटक करण्यात यश आले. रितिका हिची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी सीआयडीने पुरेपूर प्रयत्न केले, मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. यानंतर सीआयडीने सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली.

सीआयडीचा युक्तिवाद काय?

रामझुल्यावर दोन जणांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या रितू मालूची कोठडी अत्यंत आवश्यक असल्याचे सीआयडीने सत्र न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाच्या तपासात तिने आतापर्यंत फारसे सहकार्य केलेले नाही. त्यामुळे तपासासाठी तिची कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सीआयडीकडून करण्यात आला. उल्लेखनीय आहे सत्र न्यायालयाने रितिका मालू हिचा जामीन रद्द केल्यावर सीआयडीने अपघाताच्या सात महिन्यानंतर मध्यरात्री तिला अटक केली. यासाठी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय रात्री साडे दहा वाजता उघडण्यात आले आणि मध्यरात्री अटकेची परवानगी देण्यात आली. मालू हिच्या  अटकेवर नागपूर सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश यांनी आक्षेप नोंदवित स्वत:हून याचिका दाखल करून घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने सत्र न्यायाधीश यांच्यावर याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या निर्णय रद्द केला होता.

हेही वाचा >>>प्रेमीयुगुल आत्महत्या प्रकरण: मुलीच्या वडिलांनीही घेतला गळफास

काय आहे प्रकरण?

२४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर रामझुला पुलावर रितिका मालूने भरधाव वेगात गाडी नेत मोहमद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहमद आतिफ मोहमंद जिया यांना चिरडले होते. अपघातानंतर रितिका आणि तिची मैत्रिण माधुरी शिशिर सारडा या दोघी घटनास्थळावरून फरार होत्या. काही दिवसाने दोघींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत अपघात झाल्याची कबुली पोलिसांना दिली होती. याप्रकरणी तहसील पोलिसांनी भादंविच्या कलम २९७, ३३८, आणि ३०४ (अ) अंतर्गत जामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. सत्र न्यायालयाने रामझुला अपघातातील मुख्य आरोपी रितिका मालूचा जामीन फेटाळला आणि अपघातानंतर २१४ दिवसांनी सीआयडीला कारवाई करण्याची परवानगी दिली होती.