नागपूर : उत्तर प्रदेशातील राणीपूर हा भारतातील ५३वा व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला आहे. या प्रकल्पाचे क्षेत्रफळ ५२९.३६ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त असून गाभा क्षेत्र २३०.३२ आणि बफर क्षेत्र २९९.०५ चौरस किलोमीटर आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी ट्वीटरवर ही घोषणा केली. या नवीन व्याघ्रप्रकल्पामुळे व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशातील हा चौथा व्याघ्रप्रकल्प असून भारतातील ५३वा व्याघ्रप्रकल्प ठरला आहे. उत्तर प्रदेशात राणीपूर व्यतिरिक्त दुधवा, पिलीभित आणि अमनगड हे तीन व्याघ्रप्रकल्प आहेत. अमनगड हा जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यानाचा बफर झोन असून उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये आहे. दुधवा व्याघ्रप्रकल्प लखीमपूर येथे तर पिलीभित व्याघ्रप्रकल्प पिलीभित येथे आहे. उत्तर प्रदेश सरकारने २८ सप्टेंबरला बुंदेलखंड प्रदेशात पहिल्या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासास मान्यता दिली. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत राणीपूर वन्यजीव अभयारण्याच्या अधिसूचनेलाही मान्यता दिली. योगी आदित्यनाथ सरकारने देखील व्याघ्रप्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राणीपूर व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठान आणि आवश्यक पदांना मंजुरी देण्यात आली.

राणीपूर व्याघ्र प्रकल्प उत्तरेकडील उष्णकटिबंधीय कोरडय़ा पानझडी जंगलांनी व्यापलेला आहे आणि वाघ, बिबटय़ा, अस्वल, ठिपकेदार हरीण, सांबर, चिंकारा यासारख्या सस्तन प्राण्यांचे घर आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, या व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेमुळे परिसरात निसर्ग पर्यटनाचा मार्ग खुला होईल आणि मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranipur in uttar pradesh gets 53rd tiger reserve status zws