नागपूर : मुंबईकडे कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांच्यासारखे स्टार खेळाडू आहेत, मात्र विदर्भाचा संघही जोमात आहे. त्यामुळे सोमवारपासून नागपूरच्या जामठा मैदानावर रणजी चषक मधील उपांत्य फेरी सामना चुरशीचा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुखापतीमुळे यशस्वी जैस्वाल मुंबई संघाबाहेर जाणे निश्चित आहे. जैस्वाल दुखापतीवरील उपचारांसाठी बंगळुरूतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये जाईल. कारण, भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघासोबत तो जाणार नसून राखीव खेळाडू म्हणून त्याला ठेवण्यात आले आहे. जैस्वालच्या अनुपस्थितीमुळे कोणत्याही परिस्थितीत मुंबईची ताकद कमी होणार नाही, याची काळजी संघ व्यवस्थापन घेत आहे. हा सामना गतवर्षीच्या अंतिम लढतीची पुनरावृत्ती असेल. त्या लढतीत मुंबईने विदर्भला नमवून विजेतेपद पटकावले होते. मुंबईकडे कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांच्यासारखे स्टार खेळाडू आहेत. हे खेळाडू कधीही सामन्याची दिशा बदलू शकतात. स्टार खेळाडूंच्या उपस्थितीपेक्षा ४२ वेळा विजेत्या संघाचा दृढनिश्चय त्यांना वेगळी ओळख देतो. चालू सत्रात मुंबईचे अनेक आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर ठाकूर आणि तनुष कोटियान यांच्यासारख्या तळातील फलंदाजांनी शानदार कामगिरी करत संघाला संकटातून बाहेर काढले आहे. हरयाणाविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत मुंबईने ११३ धावांवर सात गडी गमावले होते; पण शम्स मुलानी आणि कोटियान यांनी आठव्या गड्यासाठी १८३ धावांची भागीदारी करत संघाला पुनरागमन करून दिले होते. नागपूरमध्ये फलंदाजीत सातत्य राखण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे विदर्भचा संघही शानदार फॉर्मात आहे. हर्ष दुबे, यश ठाकूर, आदित्य ठाकरे आणि नचिकेत भूट यांनी विदर्भसाठी शानदार गोलंदाजी केली आहे. यश राठोड, करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर फॉर्मात आहेत.

गुजरात केरळशी भिडणार

माजी विजेते आणि यजमान गुजरात आक्रमक खेळ आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या उपांत्य लढतीत केरळविरुद्ध वरचढ ठरण्याची शक्यता आहे. गुजरातचा संघ २०१६-१७चा विजेता आहे; पण २०१९-२० नंतर पहिल्यांदाच त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत सौराष्टला एक डाव ९८ धावांनी पराभूत केले होते. गुजरातने मनन हिंगराजिया, जयमीत पटेल आणि उर्विल पटेल फॉर्मात आहेत.