नागपूर : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडताच राज्यातील तापमानाचा पारा देखील उंचावला आहे. राज्यातील उन्हाची दाहकता वाढतच असून सोमवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे करण्यात आली. उन्हाळ्यातील या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.
राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि वाढत्या तापमानाला थोडा ‘ब्रेक’ लागला. त्याआधी देखील राज्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. आता अवकाळी पावसाने उसंत घेताच वातावरण थंड होण्याऐवजी तापमानात झपाट्याने वाढ झाली. एप्रिल महिना जसजसा समोर सरकत आहे, तसतशी तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी अकोल्यातील तापमान ४४.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. जिल्ह्याचे तापमान सरासरी तापमानापेक्षा चार अंश सेल्सिअस जास्त आहे. यासोबतच, हे हंगामातील सर्वाधिक तापमान आहे. त्यापाठोपाठ ब्रम्हपूरी येथे ४३.८ तर अमरावती व चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी झाली.
उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद दरवर्षीच विदर्भात होते. आताही उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे. तर पुढील काही दिवसात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यताही वर्तवली आहे. गुजरात आणि वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमान झपाट्याने वाढत आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही शहरांमध्ये तापमान ४१ व ४२ अंश सेल्सिअसपलीकडे गेले आहे.
हवामानात बदल
दक्षिणेकडे हवामानाच्या प्रणालीत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. तर त्याचवेळी उत्तरेकडून देखील उष्ण वारे राज्याच्या दिशेने येऊ लागले आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून किमान तापमानात वाढ होत आहे. विदर्भात या तापमानाचा कडाका अधिक आहे. अकोला, अमरावती, नागपूर, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या शहरांमध्ये तापमान ४२ ते ४४ अंशं सेल्सिअसदरम्यान आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही शहरांमध्येही पारा चांगलाच वाढत आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अवकाळी पाऊस
राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट अजूनही थांबलेले नाही. तीन दिवसानंतर पून्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान विजांचा कडकडाट, सोसायट्याचा वारा आणि वादळी हवामान महाराष्ट्रासह देशातील इतरही भागांमध्ये पाहायला मिळू शकतं. त्यामुळं यंदाच्या आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाली असली तरीही शेवट मात्र अवकाळीने होणार असल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे.
शहर – तापमान
अकोला – ४४.२
ब्रम्हपूरी – ४३.८
अमरावती – ४३.६
चंद्रपूर – ४३.६
नागपूर – ४२.४
वाशिम – ४२.२
वर्धा – ४२.०
यवतमाळ – ४२.०
परभणी – ४२.१
जळगाव – ४२.५
सोलापूर – ४२.०