भंडारा : काल मध्यरात्रीपासून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर कारधा नदीच्या लहान पुलावरून पाणी शहरातील सखल भागात शिरते. भंडारा शहरात बिटीबी बाजारात पाणी शिरल्याने बाजार बंद आहे. तसेच बिटीबी मार्केटलगत बांधण्यात आलेले शासकीय महिला व बाल रुग्णालयातसुद्धा पुराचे पाणी शिरले आहे. सध्या आत प्रवेश करता येत नाही.
संपूर्ण रस्त्यावर दवाखान्यासमोर पाणी साचलेले आहे व पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र आजवर पूर परिस्थिती निर्माण झाली की सरकारी दवाखाना परिसर, अशोका हॉटेल व स्मशान घाट असा सर्व परिसर बुडतो. महिला रुग्णालयासाठी चुकीची जागा निवडण्यात आल्याने पुराच्या वेळी हा दवाखाना बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महिला रुग्णालयाचा मुद्दा कायम चर्चेचा विषय ठरतो.
हेही वाचा – “भाजपाकडूनच राम मंदिराला धोका”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…
भंडारा शहरांमध्ये तहसील कार्यालयाच्या पुढे ऑफिसर क्लबमध्ये व त्यामागील रोपवाटिका येथे भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध असताना सरकारी रुग्णालय याच ठिकाणी का बांधण्यात आले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांमध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.