यवतमाळ : पेरेग्रीन फाल्कनची उपप्रजाती असणारा शिकारी पक्षी ‘शाहीन फाल्कन’ हा गेल्या पाच महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरणाच्या परिसरात मुक्कामास आहे. ही नोंद येथील अमोलकचंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख तथा पक्षीतज्ज्ञ प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांनी घेतली आहे. शाहीन फाल्कन हा पक्षी भारतात स्थलांतरित पक्षी प्रजातींच्या सूचित येत नाही. विदर्भासोबतच महाराष्ट्रात हिवाळ्यात तो आढळत असल्याच्या नोंदी असल्याचे जोशी यांनी सांगितले.
शाहीन फाल्कन हे या शिकारी पक्षाचे इंग्रजीतील नाव आहे. मराठीत शाहीन ससाणा असे नाव आहे. हा पक्षी एकाच ठिकाणी फार काळ वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरणाच्या परिसरात गेल्या पाच महिन्यांपासून हा शाहीन फाल्कन मुक्कामी असल्याने ही नोंद महत्वाची असल्याचे प्रा. डॉ. जोशी म्हणाले. पेरेग्रीन फाल्कन गेल्या अनेक वर्षांपासून ऑक्टोबर ते मार्च महिन्या दरम्यान दोन ते तीन वेळा दृष्टीस पडतो.
हेही वाचा…VIDEO: जेव्हा वाघाला देखील आळस येतो… केसलाघाटची ही वाघीण पाहिली का?
शाहीनची यवतमाळातील पहिली नोंद २३ ऑक्टोबर २०२३ रोजी बेंबळा धरण परिसरातील खडकसावंगा परिसरात प्रा. डॉ. प्रवीण जोशी व स्वानंद देशपांडे यांनी घेतली. तेव्हापासून हा ससाणा सतत बेंबळा परिक्षेत्रात खडकसावंगा, फाळेगाव, पहूर, दाभा व राणी अमरावती या परिसरात दृष्टीस पडला. त्याच्या वात्सव्याची अखेरची नोंद २५ फेब्रुवारी २०२४ घेतल्याची प्रा. जोशी यांनी सांगितले. गेल्या पाच महिन्यांपासून हा पक्षी या परिसरात आहे, ही पक्षी अभ्यासकांसाठी महत्वाची बाब ठरली आहे.
शाहीन ससाणाबद्दल…
शाहीन हा एक लहान आणि शक्तिशाली शिकारी ससाणा आहे. ज्याचा शरीराचा वरचा भाग काळ्या रंगाचा, बारीक, गडद रेषा असलेला आणि घशावर पांढरा रंग छातीपासून पोटाचा संपूर्ण भाग तांबूस रंगाचा असतो. तो जगातील सर्वात वेगाने उडणारा शिकारी पक्षी आहे. विशेष म्हणजे तो त्याची शिकार हवेतच पकडतो त्याच्या नावे ताशी ३७० किलोमीटर वेगाने उडण्याची नोंद आहे.
हेही वाचा…वर्धेतून काँग्रेसच लढणार; कोणी दिली ही हमी? वाचा सविस्तर…
कबुतर, पोपट व याच आकाराचे पक्षी त्याचे आवडते शिकार आहेत. शाहीन भारतासह बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान तसेच चीनचा दक्षिण, पूर्व भाग व उत्तर म्यानमारमध्ये आढळतो. भारतात हा आयुसीएनच्या सूचित या पक्षाची नोंद असली तरी अन्य देशात चिंताजनक सूचित याची नोंद आहे. यवतमाळ हे पक्षांच्या स्थलांतराच्या मार्गावर येते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून शाहीन ससाण्यामागे आपण आहोत . पाच महिन्यांच्या कालावधीत या पक्षाची जवळपास सात वेळा नोंद केली. हा पक्षी बेंबळा धरणाच्या परिसरात प्रजननासाठी तर वास्तव्यास नाही ना, याचा शोध घेणे सुरु असल्याचे प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांनी सांगितले.