नागपूर : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर नरहर गावाजवळ आढळून आले. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपद्वारे छायाचित्र घेण्यात आले ते ठिकाण एका हंगामी पाण्याचा प्रवाहाजवळ होते. मध्य भारतामध्ये बिबट्या मांजर दिसण्याची ही पाहिलीच घटना आहे.
मांजर कुळातील एकूण १५ प्रजाती भारतात आढळतात. भारतात असलेल्या एकूण मांजर कुळातील प्रजातींपैकी १० लहान प्रजातीं आहेत. या लहान प्रजातीं मुख्यत: उंदीरांच्या शिकारीमुळे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय भूमिका बजावतात. सद्यस्थितीत सदर प्रजाती बदल माहितीची कमतरता आहे.
हेही वाचा…नागपूर : न्यायालयात याचिका दाखल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी उघडले कस्तुरचंद पार्क…
बिबट्या मांजर (शास्त्रीय नाव Prionailurus bengalensis) जी भारतातील रान मांजरीनंतर सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे. तिच्या अनुकूल लवचिकतेमुळे, ईशान्य भारत, उत्तर हिमालयीन राज्ये, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि पश्चिम घाटाच्या काही भागात मर्यादित रितीने सापडते आहे. परंतु मध्य भारतात बिबट्या मांजरचे अस्तित्व नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आग्नेयेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उत्तरेला पेंच व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश) आणि ईशान्येला कान्हा व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश) सह कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी दर्शविते.
बिबट्या मांजर हे मानसिंग देव वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या बफर वनपरिक्षेत्र ‘नागलवाडी’ च्या नरहर बीटमधील कक्ष क्रमांक ६६३ मध्ये सापडली आहे. हा परिसर ‘नरहर’ गावापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे.
सध्याच्या शोधामुळे आतापर्यंत तुलनेने कमी-अभ्यास केलेल्या मांजर कुळातील बिबट्या मांजरच्या सविस्तर अभ्यासासाठी व अधिक कामांसाठी मार्ग मोकळा होईल आणि भारतातील त्याच्या सविस्तर वर्गीकरण करण्याची अधिक चांगली संधी मिळेल, असे पेंच व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी सांगितले.