अकोला : अत्यंत दुर्मीळ समजली जाणारी पांढऱ्या रंगाची चिमणी अकोला जिल्ह्यातील राजुरा घाटे येथे आढळून आली आहे. पक्षी निरीक्षणादरम्यान पक्षीमित्र व शालेय विद्यार्थ्यांना ही चिमणी आढळली. या दुर्मीळ घटनेची नोंद घेण्यात आली आहे. ‘मेलॅनिन’ रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असल्याने चिमणीचा रंग पांढरा होतो, अशी माहिती पक्षीमित्र तथा शिक्षक मनोज लेखनार यांनी दिली.
त्वचेमध्ये ‘मेलॅनिन’ हा रंगद्रव्याचा प्रकार असतो. या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे त्वचेचा रंग काळा, गोरा, सावळा किंवा पांढरा असतो. याच प्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या बाबतीत ‘मेलॅनिन’ रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो. त्यामुळे कातडी किंवा पंख संपूर्णपणे पांढरे होतात. त्याला इंग्रजीमध्ये ‘अल्बिनिझम’ म्हणतात.पूर्ण ‘अल्बिनिझम’ क्वचितच आढळतो. आतापर्यंत भारतामध्ये ‘हाऊस क्रो’, ‘कॉमन किंगफिशर’, ‘रेड वेंटेड’ बुलबुल, मुकुट असलेला ‘स्पॅरो लार्क’, ‘ब्लू रॉक पिजन’, सातभाई आदी पक्ष्यांच्या जातींमध्ये ‘अल्बनिझम’ आढळून आला आहे, असे पक्षीमित्र मनोज लेखनार म्हणाले.
दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र तथा शिक्षक मनोज लेखनार हे गत चार वर्षांपासून त्यांच्या शाळेत निसर्गकट्टाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य करीत आहेत. दरवर्षी ते ऑनलाइन चिमणी गणना व चिमणी घरटे कार्यशाळा घेत असतात.यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. मनोज लेखनार विद्यार्थ्यांसह राजुरा घाटे परिसरात नियमित पक्षी निरीक्षणासाठी जातात. याच निरीक्षणातून त्यांना शाळा परिसरात पांढरी चिमणी आढळून आली. त्याची नोंद घेऊन त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना माहिती दिली. त्यांनी ही नोंद अत्यंत दुर्मीळ असल्याचे सांगितले.
या पांढऱ्या चिमणीचे दर्शन हे विद्यार्थ्यांच्या पक्षी निरीक्षण व चिमणी संवर्धानाचे यश आहे. शाळेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना येवले, स्वप्नील दुतोंडे, सुनील गाडेकर, प्रसाद कुलकर्णी, गावचे सरपंच बंडू घाटे व शा.व्य.स. अध्यक्ष संदीप बरडे यांचे सहकार्य लाभत असल्याचे मनोज लेखनार म्हणाले.चिमण्यांचे विविध प्रकार आहेत. काही चिमण्या नियमित नजरेस पडतात. काही अत्यंत दुर्लभ असतात. त्यातीलच पांढरी चिमणी शालेय परिसरात दिसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. विद्यार्थ्यांमधील पक्षी निरीक्षणाचा उत्साह आणखी वाढेल.