नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधानाचे शिक्षण घेता येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २ श्रेयांकाचा अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला आहे. भारतीय संविधानाचा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करणारे नागपूर विद्यापीठ हे देशातील पहिलेच ठरणार आहे.

भारताच्या संविधान स्वीकृतीची ७५ वर्षे पूर्ण होत असताना विद्यापीठात प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान विषय सर्वच अभ्यासक्रमाकरिता लागू करण्यात आला आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कळले पाहिजे यासाठी विद्यापीठाने हे विक्रमी पाऊल उचलले आहे. विद्यापीठात जवळपास ३ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. म्हणजेच, या सर्व विद्यार्थ्यांना आता भारतीय संविधानाचे धडे दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या चार ही विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या जवळपास ३५० अभ्यासक्रमात भारतीय संविधान या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे.

असा आहे अभ्यासक्रम निर्मितीचा प्रवास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाचे प्राचार्य व विधि अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविशंकर मोर यांनी ही संकल्पना तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांच्यापुढे मांडली होती. त्यानुसार ८ ते २३ जून २०२२ दरम्यान सर्वच अभ्यास मंडळे, तदर्थ अभ्यास मंडळ, विशेष कार्य समिती समोर हा विषय ठेवण्यात आला. सर्वच अभ्यास मंडळांनी सर्वानुमते तो स्वीकारला. सर्व अभ्यास मंडळांनी घेतलेला निर्णय चारही विद्याशाखांच्या बैठकीत पारित करण्यात आला. विद्या परिषदेच्या ८ जुलै २०२२ च्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. या बैठकीत देखील हा निर्णय पारित करण्यात आला. तेव्हापासून वेगवेगळ्या अभ्यासक्रमात भारतीय संविधान विषय अंतर्भूत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आता सर्वच म्हणजे चार ही विद्याशाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदल करून बीए, बीकॉम, बीएससी आदी पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये उन्हाळी २०२५ परीक्षेत हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे.

तीन भाषेत पुस्तक उपलब्ध

भारतीय संविधान विषयाचे नेमका कोणता अभ्यास करावा, अशी चिंता विज्ञान, वाणिज्य, कला अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना होत असल्याने संक्षिप्त परंतु महत्त्वाचे असे ३० ते ४० पानात समजणारे छोटे पुस्तक हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेमध्ये पुस्तक विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील निःशुल्क उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांना या विषयाची आवश्यक माहिती मिळेल व विद्यापीठाच्या या स्तुत्य उपक्रमाचा उद्देश ही पूर्ण होईल, असा आशावाद डॉ. रविशंकर मोर यांनी व्यक्त केला.