राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी यावर्षी ८ एप्रिलला डॉ. सिद्धार्थ काणे रूजू झाले तेव्हा विद्यापीठाच्या ‘अच्छे दिन’ची सुरुवात होऊन ‘जुने जाऊ द्या मरणालागून’, अशाच भावना प्रत्येकाच्या ध्यानीमनी होत्या. यापुढे संशोधनाला चालना मिळेल शिवाय परीक्षेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांना कात्री लागेल, परीक्षा विभागावरील ताण कमी होईल, प्राधिकरणांतील प्राध्यापक, प्राचार्य, व्यवस्थापनाचा, विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या कामातील हस्तक्षेप कमी होऊन विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवण्यात अधिकारी तत्पर राहतील, अशी आशा होती. मात्र, यापैकी अद्याप काहीही होऊ शकलेले नाही. चार-पाच महिन्यातच डॉ. काणे यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे ‘पहिले पाढे पंचावन्न’ असल्याचा सार्वत्रिक अनुभव देत आहेत.
त्यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या ‘सदिच्छा’ भेटीत, ‘मला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या समित्यांवरील कामाचा अनुभव आणि नॅक निमित्ताने विद्यापीठाच्या कानाकोपऱ्याची, येथील माणसांची आणि त्यांच्या कामाची माहिती आहे’ असा दावा कुलगुरूंनी केला होता. मात्र, जसजसे दिवस जात आहेत. तसतसे काणे विद्यापीठाच्या कामासाठी आले नसून, कोणाच्या तरी उपकारांची परतफेड करायला आल्याचा संशय बळावत आहे.
हा संशय अधिक गडद झाला तो कुलगुरूंनी नेमलेल्या सल्लागार मंडळामुळे. सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कराडच्या कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा आहेत. त्यात ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग, सर्च फाऊंडेशनचे डॉ. अभय बंग, महात्मा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल इंडस्ट्रियलायझेशनचे संचालक डॉ. प्रफुल्ल काळे, उद्योगपती सत्यनारायण नुवा, माजी प्र-कुलगुरू डॉ. योगानंद काळे, मिहानचे उपाध्यक्ष आणि माहिती शास्त्रज्ञ डॉ. वीणा प्रकाशे समितीचे सदस्य आहेत.
गेल्या दहा वर्षांतील डॉ. वेदप्रकाश मिश्राप्रणीत सेक्युलर पॅनलचा आणि डॉ. बबन तायवाडे यांच्या यंग टीचर्स असोसिएशनचा उदय आणि पीछेहाट सर्वानाच माहिती आहे. गेल्या पाच वर्षांत सेक्युलर पॅनल गारद करून यंग टिचर्सने विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर बहुमताची छाप सोडली होती. मात्र, डॉ. काणे यांच्या येण्याने यंग टीचर्स असोसिएशनची पीछेहाट होऊन सेक्युलर पॅनलच्या मंडळीची वेगवेगळ्या पदावर वर्णी लावण्यात आली. विद्यापीठातील प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरण मेश्राम, विद्यापीठ व महाविद्यालये विकास मंडळाचे संचालक डॉ. दिनेश अग्रवाल यांच्या नियुक्तयांनी ते लपलेले नाही. आताच्या सल्लागार मंडळाच्या नियुक्तयांमुळे कुलगुरू दबावात काम करीत आहेत किंवा त्यांनी केलेल्या कामाची परतफेड तरी करीत आहेत, असे स्पष्ट दिसून येते. एकूण डॉ. काणे यांच्याविषयी उच्च शिक्षण वर्तुळात ‘चांगला माणूस’ म्हणून ओळख होती ती हळूहळू पुसली जात आहे. सल्लागार मंडळ अस्तित्वात आले असले तरी त्यांचा सल्ला मानलाच पाहिजे, असे अजिबात नाही, असे कुलगुरूंनी पत्रकारांना सांगितले. मात्र, कायदा अस्तित्वात असूनही ज्याचे हितसंबंध जपले जातात, ते कसे टाळता येतील, यावर कुलगुरूंनी काहीच सांगितले नव्हते. मुळात ही सल्लागार समिती तरी अस्तित्वात राहणार काय? कारण आज ना उद्या या समितीला कुलपतींकडे आव्हान मिळेलच.
विद्यापीठात विधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्वत परिषद, तक्रार निवारण समिती, अभ्यासमंडळे, विद्याशाखा असतात तेव्हा प्राधिकरणांचा निर्णय राबवत असल्याने अनेक कामे किंवा चुकीची कामे प्राधिकरणांतील प्राचार्य, प्राध्यापक, व्यवस्थापनांमुळे कशी राबवली जातात आणि आमच्या कर्तृत्वाला कसा वाव दिला जात नाही, याविषयी विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून गळे काढले जातात. विद्यापीठात नवीन कुलगुरू येणे, हळूहळू डॉ. बबन तायवाडे यांच्या यंग टीचर्स असोसिएशनचे वर्चस्व कमी होणे, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची मुदत ३१ ऑगस्टला संपणे आणि त्यानंतर नवीन कायद्याच्या प्रयोजनात विद्यापीठाच्या निवडणुका एक वर्ष लांबणीवर पडल्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना विद्यार्थी हिताच्या अनेक योजना, उपक्रम राबवण्यात चांगली संधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कुलगुरूंनी मध्येच सल्लागार समितीची नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मध्ये सल्लागार समिती स्थापन करण्याची तरतूद असल्याचे काहींचे मत आहे. मात्र, अशाप्रकारे कुलगुरूंना सल्ला देण्यासाठी महाराष्ट्रातील कोणा विद्यापीठाने अशाप्रकारे समितीची स्थापन करून स्वत: कुलगुरू निर्णय घेण्यासाठी अक्षम असल्याची परंपरा कोणत्याही विद्यापीठाने आतापर्यंत पाळली नाही. ती नागपूर विद्यापीठ पाळीत असल्याचा सुप्त राग विद्यापीठाच्या प्राधिकरणांवर अनेकवर्षे काम करणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे. त्यातच सदस्य सचिव पदावरून नाराजी आहे. वीणा प्रकाशे यादेखील वेदप्रकाश मिश्रा गटाशी संबंधित असून, त्यांची विद्यापीठातील कारकीर्द उभी राहण्यात मिश्रांचा हातभार लागला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सेक्युलर पॅनल मेहरबान असण्याची शक्यता जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा