नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने काही उजव्या विचारधारेच्या स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने विविध कार्यक्रमांच्या नावावर पैशांची उधळपट्टी सुरू केल्याचा आरोप होत आहे. संलग्नित महाविद्यालये व विद्यार्थ्यांच्या शुल्कातून नुकताच चित्रपट महोत्सव व आता राष्ट्रीय पुस्तक मेळयासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीशिवाय पर्याय नाही, असे अधिसभेच्या बैठकीत सांगितले जात असताना दुसरीकडे कार्यक्रमांच्या नावावर मात्र उधळपट्टी सुरू असल्याने प्रशासनाच्या विरोधाभासी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नागपूर विद्यापीठ हे मध्यभारतातील सर्वात जुने आणि श्रीमंत विद्यापीठ आहे. परंतु, नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेक महाविद्यालयांचे संलग्निकरण काढले जाणार आहे. परिणामी, विद्यापीठाच्या वार्षिक उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होणार आहे. विद्यापीठाच्या उत्पन्नात घट होत असल्याने भविष्यात शुल्कवाढीशिवाय पर्याय नाही, असे मत प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत व्यक्त केले होते. असे असताना, दुसरीकडे काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विद्यापीठात कोट्यवधी रुपयांचे कार्यक्रम घेतले जात आहेत. ११ व १२ जानेवारीला विद्यापीठामध्ये नागपूर चलचित्र फाउंडेशनसोबत मिळून चित्रपट महोत्सव घेण्यात आला. याचा आर्थिक भुर्दंड विद्यापीठावर बसला. आता विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राअंतर्गत राष्ट्रीय पुस्तक मेळा घेतला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये दोन कोटी रुपये अंदाजित खर्च प्रस्तावित आहे.

विद्यार्थ्यांच्या पैशांवर डोळा?

पुस्तक मेळामध्ये संस्थांकडून पैसे आकारले जातात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून पुस्तक मेळाव्याचा बराच खर्च पूर्ण करता येतो. असे असतानाही विद्यापीठाचा विद्यार्थ्यांच्या पैशांवर डोळा का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन कोटी रुपये हा वारेमाप खर्च असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

विद्यापीठ हे विविध प्राधिकरणानुसार काम करते. अर्थसंकल्पामध्ये अशी कुठली तरतूद केली असेल तर ही अधिसभेच्या बैठकीत समोर येईल. ती मंजूर करण्याचा संपूर्ण अधिकार अधिसभेला आहे. त्यांना ती चुकीची वाटेल तर नाकारण्याचाही अधिकार आहे.

डॉ. प्रशांत बोकारे, प्रभारी कुलगुरू.

Story img Loader