वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत विवाहावर खूप खर्च नको. विवाहसाठी कर्ज, उसनवारी करीत अनाठायी खर्च टाळण्याचा संदेश त्यांनी ग्रामगीतेतून दिला. हिंदू धर्मात लग्न संस्कार हा प्रमुख १६ संस्कारापैकी एक मानल्या जात असल्याने तो स्मरणीय ठरावा असा प्रयत्न असतो. त्यामुळे आजकाल करोडो खर्च करीत धडाक्यात लग्न सोहळे पार पडत असल्याचे चित्र आहे. मात्र त्याचवेळी अनाठायी खर्च नको, या राष्ट्रसंतांच्या संदेशाचे पण पालन करण्याची भावना तर वाढत चालली नाही नां, असे एका घडामोडीतून म्हणता येईल.
येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात गत अकरा महिन्यात १६४ विवाह हे नोंदणी पद्धतीने पार पडले.विवाहाचा कायदेशीर पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. पण ते नं घेता शेकडो विवाह हे सगे सोयरे व प्रतिष्ठित मंडळीच्या उपस्थितीत संपन्न होत असतात. नोंदणी पद्धतीने कमी होत असले तरी प्राप्त आकडेवारी ही सूचक म्हणावी लागेल.दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी साठी येणारे कमीच, असे अधिकारी सांगतात. विदेशात असणारे युवक पासपोर्टची गरज म्हणून वधूचा असा दाखला काढून घेतात. रशिया येथील युवकाने नुकताच या पद्धतीने विवाह करीत अनावश्यक बाबी टाळल्या.मूळची सावंगी येथील असलेली वधू ही रशियात उच्च पदावर कार्यरत आहे. दोघांचे प्रेम जुळले.
हेही वाचा…डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव होताच यवतमाळात आनंद
भारतीय संस्कृतीचे आकर्षण म्हणून येथे विवाह केल्याचे युवक सांगतो. कार्यालयात लग्न सोपस्कार पूर्ण झाले. यावेळी मुलाचे आईवडील रशियातून येथे उपस्थित झाले होते. नांदा सौख्य भरे हे स्वर मात्र उमटले नाहीत.सध्या लग्नसराइचा धूमधडाका सूरू आहे. त्यामुळे आणखी विवाह या पद्धतीने होण्याची शक्यता व्यक्त होते. लग्न करून कायदेशीर नोंदणी करण्याची सोय नगर परिषदेत पण उपलब्ध असते. मात्र नोंदणी पद्धतीने विवाह लावून दिल्या जात नाही. तसेच अनेक वैदिक विवाह मंडळे पण आहेत. साध्या पद्धतीने म्हणजे फार बडेजाव, खर्च नं करता ही मंडळे मोजक्या आप्तांच्या उपस्थितीत लग्न लावून देत असतात. दुय्यम निबंधक कार्यालयात पण मोजक्याच्या साक्षीत वर वधू एकमेकांना केवळ हार टाकून व पेढा भरवून लग्न आटोपतात. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या काळात पार पडलेल्या नोंदणी विवाहामुळे नव्या पिढीचा कल सुधारणावादी दिसू लागला आहे, अशी गमतीदार टिपणी एका कर्मचाऱ्याने केली.