राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल केला आहे. यापुढे अर्ध्या सत्राच्या परीक्षा महाविद्यालय तर अर्ध्या सत्रांच्या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. करोनामुळे बिघडलेल्या वेळापत्राचा फटका आताही परीक्षांना बसत असून यंदा उन्हाळी परीक्षा मे महिन्यात सुरू होणार आहेत.
हेही वाचा >>>किमान समान कार्यक्रमाचा ‘सावरकर’ मुद्दा नाही, राजकीय परिस्थितीतून ठाकरे गटाशी युती – पटोले
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबल्याने विद्यापीठाच्या परीक्षांवर त्याचा परिणाम पडला आहे. प्रथम सत्राच्या हिवाळी परीक्षा आतापर्यंत सुरू होत्या. अनेक परीक्षांचे निकालही प्रलंबित आहेत. हिवाळी-२०२२ पुरवणी परीक्षेला सोमवार २० मार्चपासून प्रारंभ झाला. तृतीय सत्राच्या या परीक्षा महाविद्यालय स्तरावर सुरू आहेत. अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तृतीय सत्राच्या हिवाळी-२०२२च्या पूरक परीक्षा २० ते ३१ मार्चदरम्यान होणार आहेत.
लेखी आणि प्रात्यक्षिक, अशा दोन्ही परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षांनाही यंदा विलंब झाला आहे. हिवाळी परीक्षा संपताच उन्हाळी परीक्षांना मे महिन्यात सुरुवात होणार आहे.