राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विधिसभा निवडणुकीमध्ये पदवीधरच्या दहा जागांवर होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीमध्ये सहा जागांवर विजय मिळवणाऱ्या उजव्या विचारधारेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या अनेक संघटना यंदा मैदानात उतरल्याने त्यांच्या मतांचे विभाजन होऊन अभाविपच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>>नागपूर: महाठग अजित पारसेविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा, १८ लाखांनी गंडविले
विधिसभेच्या निवडणुकांमध्ये पदवीधर प्रवर्गातील १० जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी विविध संघटनांकडून दावेदारी करण्यात येत आहे. शेवटच्या दिवशी १३८ उमेदवारांनी अर्ज दखल केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपली ताकद दाखवत सोमवारी दहा जागांवर अर्ज दाखल केले. यावेळी विष्णू चांगदे, दिनेश शेराम, वामन तुर्के यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. गेल्यावेळी दहापैकी सहा जागांवर विद्यार्थी परिषदेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे इतर संघटनांसमोर अभाविपचे तगडे आव्हान राहणार आहे. अभाविप आणि शिक्षण मंचाला आव्हान देण्यासाठी यंदा आमदार ॲड. अभिजित वंजारी यांची सेक्युलर पॅनल आणि डॉ. बबनराव तायवाडे यांची यंग टीचर्स एकत्र आली आहे. विद्यापीठ परिवर्तन पॅनलने मागील वर्षी पहिल्यांदा निवडणूक लढवत शिलवंत मेश्राम आणि प्रशांत डेकाटे हे दोन उमेदवार निवडून आणले होते. त्यामुळे यंदा अशा धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या संघटनांचे अभाविपसमोर कडवे आव्हान असेल असे बोलले जात होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या अन्य संघटनांनीही उडी घेतली आहे. अतुल खोब्रागडे यांची युवा ग्रॅज्युएट फोरम, शिक्षक भारती, शिवसेना, वर्धा येथील नितेश कराडे यांचीही संघटना निवडणुकीमध्ये उतरली आहे. यंदा पहिल्यांदाच समविचारी संघटना निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे त्यांच्या मताचे विभाजन झाल्यास अभाविपला त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही संघटनांशी संवाद साधला असता सर्वच संघटना त्यांची मतदार नोेंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगत आमचे मतदार फुटणार नाही, असा दावा करीत आहेत.
हेही वाचा >>>नागपूर: चार्जिंग स्टेशनच्या जागेसाठी एकही प्रस्ताव नाही, महापालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
ओबीसी प्रवर्गात तुल्यबळ लढत
पदवीधर प्रवर्गातील लढत प्रत्येकवेळी तुल्यबळ ठरली आहे. यंदाही ही लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. तीन निवडणुका लढणारे काटोल येथील अमित काकडे यांचा यंदाही अर्ज आहे. अभाविपसमोर त्यांचे आव्हान राहत असे. मात्र, यंदा पहिल्यांदाच विद्यार्थी आणि ओबीसी चळवळीमध्ये काम करणाऱ्या उमेश कोर्राम यांनीही अर्ज दाखल केला आहे. अभाविपमधून सुनिल फुडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही ही निवडणुक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
खुला वर्ग – ७५
ओबीसी – २४
अनुसूचित जाती – १४
अनुसूचित जमाती – ०६
विमुक्त जाती – ११
महिला प्रवर्ग – ०८
एकूण – १३८
मतांचे विभाजन होईल असे वाटत नाही. अनेक वर्षांपासून विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या संघटनांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून स्वत:च्या फायद्याकडेच अधिक लक्ष दिले. त्यामुळे अशा संघटनांच्या आश्वासनांना पदवीधर कंटाळले आहेत. -अतुल खोब्रागडे, युवा ग्रॅज्युएट फोरम.