अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाकडून राज्यातील २८८ मतदारसंघात तयारी चालवली आहे. इतर पक्षांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. आपले १० आमदार निवडून आले तरी पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.
अकोला येथे पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महादेव जानकर यांनी ‘एकला चलोरे’ची भूमिका घेतल्याने महायुतीतून आणखी एक पक्ष दुरावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महायुतीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची ३१ला सभा, काय बोलणार?
राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक आहे. मात्र, प्रत्येक पक्षाला आपला जनाधार वाढला पाहिजे, अशी अपेक्षा असते. विविध पक्षांचे दलाल येतील. त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी असा विचार आता करू नका. रासप देखील एक दिवस राज्य करणार आहे. कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे. आपली राज्यात ताकद किती आहे, हे बघायचे आहे. राज्यात पक्षाची रेष वाढवायची आहे. त्यामुळे २८८ जागांवर तयारी करण्याचे काम सुरू झाले. प्रत्येक मतदारसंघात संघटन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे महादेव जानकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>> वादग्रस्त ‘आयएएस’ अधिकारी शुभम गुप्ताच्या अडचणीत वाढ, कार्यकाळातील सर्व प्रकरणांची होणार चौकशी…
महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपाची चर्चा झालेली नाही. आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीने ठरवल्यानुसार २८८ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यापैकी १०९ ठिकाणी आपले केंद्रनिहाय नियोजन करण्यात आले. पक्षाने दिलेला हाच आपल्या जातीचा, धर्माचा, नात्याचा उमेदवार म्हणून त्याचे काम करावे.
एखाद्या तालुक्यात १० तर दुसऱ्या ठिकाणी एक लाख मते देखील आपल्या पक्षाला पडतील. पक्षाचा एक आमदार असताना कॅबिनेट व राज्यमंत्री असे दीड मंत्रिपद घेतले होते. आता १० आमदार निवडून आणा, पक्षाचा मुख्यमंत्रीच करू, असे देखील महादेव जानकर म्हणाले.
मराठा समाजाचे १४ मुख्यमंत्री तरीही… मराठा समाजाचे राज्यात १४ मुख्यमंत्री झाले. तरी देखील आरक्षण मागावे लागत आहे. याचा विचार केला पाहिजे, असे महादेव जानकर म्हणाले. मराठ्यांना आरक्षण मिळावे मात्र ओबीसीतून देऊ नये. महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील जानकर यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून राजकारण होणे दुर्दैवी आहे, असे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले.