Rashtriya Swayamsevak Sangh Marks 100 Years : आगामी विधानसभा निवडणुका व संघाचे शतकोत्तर वर्षात पदार्पण होणार असून या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्राे) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहेत. या उत्सवाची तयारी संघाकडून जोरात सुरू असून बुधवारी स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचा सरावही केला. या कार्यक्रमातून सरसंघचालक स्वयंसेवकांना काय संदेश देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. शतकोत्तर महोत्सवाच्या निमित्ताने संघाला हे नाव कसे मिळाले? या नावाची कल्पना कुठून आली याविषयी सविस्तर जाणून घेऊया…
संघाच्या शाखेचा प्रवास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शाखा हे अविभाज्य समीकरण. निष्ठावंत घडवण्याची कार्यशाळा म्हणूनही शाखेकडे बघितले जाते. संघाची बिजे नागपुरात रोवली गेली. आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १७ जणांना घेऊन सुरू केलेल्या शाखेपासून ते आज शहरात असलेल्या ३३० शाखांपर्यंतचा प्रवास तसा संघर्षाचा राहिला आहे. संघाच्या स्थापनेपासून ते शतकोत्तर वर्षाच्या विस्तारात नागपूरचे विशेष महत्त्व. ‘शाखा’ हा संघाचा आत्मा तर येथे येणारा प्रत्येक स्वयंसेवक हा त्याचा श्वास.
हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांवर दिवसभर विश्रामगृहातच बसून राहण्याची नामुष्की, काय नेमके घडले?
शेवटी या नावावर झाले एकमत
ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांनी संघाच्या शतकी प्रवासाचे अनेक पैलू उलगडले. ते म्हणाले, संघाचे नाव ठरायचे होते तेव्हा रामटेकमध्ये होणाऱ्या रामनवमी उत्सवामध्ये सेवा द्यायला स्वयंसेवक जात होते. त्यामुळे ‘राम स्वयंसेवक संघ’ असे नाव ठेवावे अशी चर्चा झाली. परंतु, शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावावर एकमत झाले. एखाद्या संस्थेचा पाया मजबूत झाल्यावर तिचा विस्तार केला जातो. डॉ. हेडगेवारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लगेच दुसरी शाखा वर्धा येथे सुरू करून विस्ताराला महत्त्व दिले. नागपुरात संघाची स्थापना झाल्याने नागपूरचे महत्त्व कायम राहावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून तृतीय वर्ष शिबीर नागपुरात घेण्यात आले. प्रचंड उन्हाळ्यात शिबिरासाठी ठरवून नागपूरची निवड करण्यात आली.
हेही वाचा – काँग्रेस मुलाखती ! अपेक्षित ते आलेच नाही, तर आलेल्यांची फिरकी
कार्यकर्ता विकास वर्गातील भाषणाची चर्चा
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-२ च्या समारोपीय कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मणिपूरसह अनेक विषयांवर भाष्य केले होते. त्यांनी यावेळी सरकारला अनेक सूचनाही केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यात डॉ. भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागले आहे.