बुलढाणा: मणिपूर राज्यामध्ये महिलेची नग्न धिंड काढून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ व महिलांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने स्थानिय जयस्तंभ चौकात निदर्शने करून रास्तारोको करण्यात आला. महिलांचा आक्रमक सहभाग आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले.
जयस्तंभ चौकामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्तारोको करत जोरदार निदर्शने केली. यामुळे चौकातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. मणिपूर घटनेतील सर्व दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, आदिवासींवरील अन्याय अत्याचार दूर करावेत आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला.