अकोला : महापालिकेच्या शाळेतील पोषण आहारामध्ये चक्क उंदराचे शेपूट आढळल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. या प्रकारामुळे सुमारे दहा विद्यार्थ्यांना विषबाधा सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर त्यांच्या भाजीमध्ये उंदराचे शेपूट असल्याचे दिसून आले. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला मळमळ झाल्यासारखे वाटले. प्रभारी मुख्याध्यापक भूतकर तसेच प्रभागातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना तातडीने डाबकी रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलविले. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
हेही वाचा – सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शालेय पोषण आहार अंतर्गत भोजन पुरविण्याचा कंत्राट प्रशासनाने वंदे मातरम सुशिक्षित बेरोजगार संस्थेकडे दिला आहे. घडलेल्या प्रकारबाबत संस्थेला पत्र दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. पोषण आहारात हलगर्जीपणाचा कळस गाठल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.