समई, पणती, तोरणासह आकाशकंदीलचे दर आटोक्यात 

विदेशी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन एकीकडे संघ परिवारातील संघटना करीत असताना  दुसरीकडे चिनी बनावटीच्या इलेक्ट्रृॉनिक वस्तूंवर ग्राहकांच्या उडय़ा पडू लागल्या आहेत. विशेषत: विद्युत दीपमाळा बाजारपेठेवर चिनी वस्तूंचेच वर्चस्व आहे.

दिवाळी हा अस्सल भारतीय सण असला तरी यानिमित्त करण्यात येणाऱ्या रोषणाईसाठी ग्राहक चिनी बनावटीच्या विद्युत दीपमाळांनाच पसंती देतात. कारण त्या स्वस्त आणि आकर्षक असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

रोषणाईसाठी वापरण्यात येणारे पारंपरिक तोरण ऐवजी चिनी बनावटीचे तोरण खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. ही तोरण वजनाने हलकी आणि आकर्षक असून त्यांची किंमतदेखील सर्वसामन्यांच्या आवाक्यात आहे. लाल, पिवळा, नारंगी, हिरवा, चांदणी, गुलाबी, पांढरा अशा अनेक  रंगात दीपमाळेचे तोरण उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या दीपमाळांमध्ये मल्टी कलर्स असून त्यामध्ये साधे आणि एलएडी दिवे लावण्यात आले आहेत. सध्या दीपमाळा चाळीस ते साठ, तर एलएडी दीपमाळा शंभर ते दोनशेच्या दरात उपलब्ध आहेत. दहा फुटांपासून तर पंचवीस फुटांमध्ये या चिनी बनावटींच्या माळा मिळतात, तर पाईप दीपमाळा देखील बाजारात आल्या आहेत.

पिक्सल रोषणाई हा नवा प्रकार बाजारात आला आहे. यामध्ये दिव्याची गुणवत्ता इतर दीपमाळाच्या तुलनेत अधिक चांगली असल्याने त्याचे दरही थोडे जास्त आहे. तसेच एएलडी प्रकारात लाईटिंग बेल्टची मागणी अधिक आहे.

पिक्सल बेल्टमागे चिटकवण्यासाठी मागच्या बाजूला सोय केली असून तो जसा हवा तसा वळवता येतो आणि लावण्यास अगदी सोपा आहे. शिवाय दिव्यांच्या पणत्या, तोरण आणि समईंची मागणीही अधिक आहे. विजेच्या  पणत्यांची माळही अगदी शंभर रुपयांत मिळत असल्याने ग्राहकांच्या त्यावर उडय़ा पडत आहेत.  लक्ष्मीपूजनासाठी दोनशे रुपयांत उपलब्ध असलेल्या विद्युत समई आणि दरवाजावर लक्ष्मीचे तोरण खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. तसेच दरवाजावर लावण्यात येणारे आकाशकंदीलही चिनी बनावटींचे आहेत.

‘‘चिनी बनावटीच्या दीपमाळा एकदा वापरा आणि फेका अशा स्वरूपाच्या आहेत. दरही कमी असल्याने ग्राहकांचा कल त्या खरेदीकडे आहे. आकाशकंदीलही प्लास्टिकमध्येच ग्राहकांना हवे आहे. कागदी कंदीलची मागणी कमी आहे.’’

– वैभव पवार, संचालक वैभव लायटिंग चिटणीसनगर