चाक निकामी झाल्याने सक्तीची पदयात्रा

नागपूर : तीन राज्यातील विजयानंतर पूर्व विदर्भातून निघणाऱ्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची रथयात्रा प्रारंभ होण्याच्या पूर्वी पंक्चर झाला. यामुळे रथावर स्वार होण्यास सज्ज झालेल्यांना खाली उतरून खुल्या जीपवर  चढावे लागले तर अनेकांना पदयात्रा करावी लागली.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यास गुरुवारी दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, विधान सभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान आदी नेते सजवलेल्या रथाकडे वळले. काही नेते त्यावर स्वार देखील झाले, परंतु रथाचे एक चाक पंक्चर असल्याचे लक्षात आल्याने सर्व नेते खाली उतरले आणि खुल्या जीपमध्ये चढले. काँग्रेस नेते मुकुल वासनिक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे पायदळ निघाले.  प्रदेश काँग्रेसने रथ तयार करण्याची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस रामकिसन ओझा यांच्याकडे दिली होती. खुल्या जीपमध्ये चढण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ दिसली. छायाचित्र काढल्यानंतर काही नेते जीपखाली उतरले.

दरम्यान, यात्रा दीक्षाभूमीहून ताजाबादला गेली. तेथून नेते टेकडी  गणपतीच्या दर्शनाला गेले. तेथून ही यात्रा संविधान चौकात आली.  रामटेकला  पहिली सभा झाली. या यात्रेमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, माजी आमदार आशीष देशमुख, नंदा पराते,  राजू वाघमारे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री  सहभागी होते. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले.

व्हीआयपी संस्कृतीबाबत नाराजी

काँग्रेसमधील नेत्यांच्या व्हीआयपी संस्कृतीवर  मुकुल वासनिक यांनी पदयात्रेदरम्यान नाराजी व्यक्त केल्याची चित्रफित वायरल झाली आहे. मुंबईहून नागपूरकरिता तीन विमाने असतानाही काही नेत्यांनी  खासगी विमानांचा आग्रह धरला, असे वासनिक म्हणत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र उपप्रभारी आशिष दुवा, राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी हा आग्रह धरल्याचे समजते. हे सर्व नेते जनसंघर्ष यात्रेकरिता नागपुरात आले.

Story img Loader