अमरावती : शासनाचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रास्त भाव दुकानदारांनी १ जानेवारी पासून संप पुकारला. त्यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ९१४ दुकानदारांनी सहभाग घेतल्याने दुकानांना कुलूप लागले आहे. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशनने हे आंदोलन पुकारले आहे. संघटनेशी संलग्नित रॉकेल विक्रेता व स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच दुकानदारांनी संपात सहभाग दर्शविला आहे. यामुळे स्वस्त धान्य वितरण ठप्प झाले आहे.
हेही वाचा >>> वाहन चालक संपावर, दुपारी दोनपर्यंत तोडगा निघणार? प्रशासनाचे ‘वेट अँड वॉच’
रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, मार्जिन मनी ३०० रुपये करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आली. मात्र निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अमरावती जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक वेलफेअर संघाचे म्हणणे आहे.