राजापूर : गेल्या काही दिवसांपासून नाटे परिसरामध्ये दिवसाढवळ्या फिरणार्‍या बिबट्याने लोकांमध्ये दहशत निर्माण केलेली असताना नाटे बांदकरवाडी येथील ग्रामस्थ सुरेश थळेश्री यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना घडली आहे. विहिरीतून बिबट्याने उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र, तो अयशस्वी ठरला. अशातच वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने पिंजऱ्याद्वारे बिबट्याला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात अखेर यश आले आहे. वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलयाची माहिती वनविभागाने दिली.

विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्या मादी जातीचा असून सुमारे अडीच ते तीन वर्षे वयाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. नाटे बांदकरवाडी येथे थळेश्री यांच्या मालकीचे विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती सरपंच संदीप बांधकर यांनी वनविभागाला दिली. दरम्यान, बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. दरम्यान, वन विभागाने तात्काळ बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला बाहर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना विहिरीची उंची सुमारे १२-१५ फूट असल्याने पिंजऱ्यामध्ये न घुसत बिबट्याने दोन वेळा पिंजऱ्यावर चढून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीच्या काठड्याला जाळी लावली असल्याने तो बाहेर येऊ शकला नाही. त्यानंतरही वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर, या प्रयत्नांना यश येताना ग्रामस्थांच्या साथीने बिबट्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधान मोदी नवरात्रीत करतात कडक उपवास; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते फक्त…”

हेही वाचा – अवघ्या शंभर मीटर अंतरावर पोलीस ठाणे, तरी पोलिसांच्या तावडीतून निसटला आरोपी, शेवटी…

विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक. प्रियांका लगड वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, लांजा सारीक फकीर, वनरक्षक विक्रम कुंभार, श्रावणी पवर, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, श्विजय म्हादये, श्दीपक म्हादये, श्नितेश गुरव, संतोष चव्हाण, नीलेश म्हादये यांनी ही कामगिरी केली.